आम्हाला बीजेपीची बी टीम म्हणणार्‍या शरद पवारांची आज स्थिती काय? : के. चंद्रशेखर राव | पुढारी

आम्हाला बीजेपीची बी टीम म्हणणार्‍या शरद पवारांची आज स्थिती काय? : के. चंद्रशेखर राव

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आम्हाला भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणणार्‍या शरद पवार व त्यांच्या पक्षाची काय स्थिती झाली आहे हे सर्वांना माहिती आहे. आम्हाला बी टीम म्हणणारे आता भाजपमध्ये घुसलेत, असा टोला लगावत महाराष्ट्रात शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. आता काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

कोल्हापूर-सांगली दौर्‍यावर आलेल्या राव यांनी मंगळवारी सायंकाळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन तेथे सुरू असणार्‍या विकासकामांची माहितीही आवर्जून घेतली. यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बीआरएस पक्षाचे तोहिद बक्षू, विक्रम जरग, संग्राम जाधव यांच्यासह संजयसिंह गायकवाड, विक्रम पाटील-सडोलीकर, दिलीप चव्हाण, संजय पाटील, श्रद्धा महागावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस-भाजपकडून लोकांच्या पदरी निराशा

आपण व आपला पक्ष एनडीएकडून आहात की इंडियाकडून, असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर राव म्हणाले, आम्ही इंडियाच्या बाजूनेही नाही आणि एनडीएच्या बाजूनेही नाही. काँग्रेसने 50 वर्षे तर भाजपने 10 वर्षे सत्ता भोगली; पण लोकांच्या पदरी निराशा आल्याची टीका त्यांनी केली. आपण तिसरी आघाडी म्हणून कार्य करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पण लोकांना नवीन पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे, असेही आवर्जून सांगितले.

शेतकरी आत्महत्येबाबत महाराष्ट्र सरकार उदासीन

महाराष्ट्र ही अद्भुत भूमी आहे. पण पैठणसारखा प्रकल्प असूनही औरंगाबादला दहा दिवसांनी पाणी येते. शेतकर्‍यांच्या आत्महत्येबाबत महाराष्ट्र सरकार उदासीन असल्याचे वास्तव आहे. महाराष्ट्रातीलच एका अधिकार्‍याने एक लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत असल्याचा अहवाल दिला मात्र सरकार याकडे दुर्लक्ष केल्याचे राव यांनी सांगितले. यावर उपाययोजना म्हणून आम्ही तेलंगणा पॅटर्न राबवण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र या सरकारला शेतकर्‍यांबाबत कोणतीही दयामाया नसल्याचे राव म्हणाले.

महाराष्ट्रात 14 लाखांहून अधिक पदाधिकारी

आपला पक्ष प्रामुख्याने शेतकरी, दलित आणि तरुणांसाठी काम करणार आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून केल्याचे राव म्हणाले. आम्ही आमचे 50 टक्के काम पूर्ण केले आहे. काही मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार महाराष्ट्रात संघटना बांधणीकडे आम्ही विशेष लक्ष देत असल्याने 14 लाखांहून अधिक पदाधिकार्‍यांची नोंदणी झाली आहे. आमच्या कामाची पद्धत बघून अनेक राजकीय पक्षांनी आमच्याशी संपर्क साधला असल्याची माहितीही राव यांनी दिली.

Back to top button