रेल्वेस्थानकावर आता ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ | पुढारी

रेल्वेस्थानकावर आता ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’

अनिल देशमुख

कोल्हापूर : कोल्हापूर रेल्वेस्थानकावर लवकरच ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू होणार आहे. याबाबतची प्रक्रिया रेल्वेने सुरू केली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवासी आणि नागरिकांसाठी 24 तास खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत.

कोल्हापूर रेल्वेस्थानकाचा अमृत भारत योजनेंतर्गत पुनर्विकास केला जाणार आहे. यादरम्यान या ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’साठी जागा निश्चित केली जाणार आहे. रेल्वे प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिक यांना याचा लाभ होईल, याद़ृष्टीने जागा अंतिम केली जाणार आहे.

रेल्वेच्या वापरात नसलेल्या एका मार्गावर (ट्रॅकवर) रेल्वेच्याच डब्याला हॉटेलचे रूप दिले जाईल, त्यात हे रेस्टॉरंट सुरू होणार आहे. अशाच प्रकारचे रेस्टॉरंट ऑन व्हील मुंबई, मिरज या ठिकाणी यापूर्वीच सुरू झाले आहेत. त्याच यादीत आता कोल्हापूर स्थानकाचाही समावेश करण्यात येणार असून, त्याकरिता आवश्यक विनावापरातील डब्याची (रेक) मागणी करण्यात आली आहे. ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’साठी निविदा काढण्यात येणार आहेत. यानंतर रेल्वे डब्याच्या स्वरूपात रेल्वे ट्रॅकवर कायमस्वरूपी हे रेस्टॉरंट सुरू होणार आहे.

रेल्वेच्या वापरात नसलेल्या डब्याला अंतर्गत आणि बाह्य बाजूने आकर्षक सजावट केली जाणार आहे. बैठक व्यवस्थेपासून आतील सर्व व्यवस्था रेस्टॉरंटसारखीच राहणार आहे. रेल्वेस्थानकातील गजबज, बाजूला रेल्वेगाड्यांची ये-जा आणि रेल्वेच्या रुळावर असणार्‍या या रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा आस्वाद कोल्हापूरवासीयांसाठी वेळीच पर्वणी ठरणार आहे.

Back to top button