कोल्हापूर : महिलेचा गळा आवळून दागिने लुटणार्यास अटक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हुतात्मा गार्डन परिसरात महिलेला ठार मारण्याच्या उद्देशाने गळा आवळून, डोक्यात दगडाने प्रहार करून अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईलसह रोकड हिसकावून घेऊन पसार झालेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण व राजारामपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी जेरबंद केले. धीरज रामचंद्र आयवळे ऊर्फ धीरज पाटील (वय 19, रा. लक्ष्मीनगर करंबळी, गडहिग्लज, सध्या रा. दत्त कॉलनी, कणेरी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.
संशयिताकडून दागिने, मोबाईल व रोख रक्कमसह 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे, राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले. रविवारी सकाळी साडेअकराला भरचौकात ही घटना घडली होती. अनपेक्षितपणे हल्ल्याचा प्रकार घडल्याने जखमी महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. संशयिताचा छडा लावण्यासाठी रविवारी सकाळी शहरात नाकाबंदी करण्यात आली होती. महिलेचा जबाब तसेच सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्यास अटक केली.
संशयिताने फिर्यादी महिलेशी संपर्क साधून मला तुला भेटायचे आहे, असे सांगितले. महिलेने नकार देताच त्याने माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन, अशी धमकी दिली. शिवाय तुझ्या नवर्याला मारणार असे सांगितले. धमकीमुळे भेदरलेल्या स्थितीत महिला संशयिताला भेटण्यासाठी गेली. महिलेने मला फोन करून का त्रास देतोस, तुझा माझा काही संबंध नाही, असे सुनावत असतानाच संशयिताने चिडून शिवीगाळ करीत महिलेला मारहाण सुरू केली.
गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच दगडाने डोक्यावर हल्ला केला. झटापटीत संशयिताने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र, कानातील रिंगा, मोबाईल तसेच रोकड अशा 40 हजारांच्या मुद्देमालासह पळ काढला होता. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकार्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सूचना केल्या होत्या.