Hasan Mushrif : ईडीच्या आरोपानंतर कोर्टाकडून दिलासा मिळालेला मी एकमेव नेता: हसन मुश्रीफ | पुढारी

Hasan Mushrif : ईडीच्या आरोपानंतर कोर्टाकडून दिलासा मिळालेला मी एकमेव नेता: हसन मुश्रीफ

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : ईडीचा आरोप झाल्यानंतर कोर्टातून एवढा दिलासा मिळणारा देशातील मी एकमेव आहे. कोर्टाने कोणालाही दिलासा दिलेला नाही. पुढच्या काळामध्ये सुद्धा मला न्यायालयातून पूर्ण दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठिंबा देण्यासाठी, राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी, राज्याच्या विकासासाठी महायुतीला पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत तुमचा मला पाठिंबा आहे, तोपर्यंत मी अपराजित राहीन, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्या बद्दल मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा शहर राष्ट्रवादीतर्फे मुरगुड येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार के. पी. पाटील, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, पंडितराव केणे प्रमुख उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रवादी हे एक आमचे कुटुंब आहे. कदाचित आमच्यामध्ये काही कारणाने मतभेद झाले असतीलही. पण अंबाबाई ची शपथ घेऊन सांगतो, नजीकच्या काळात हे कुटुंब एकसंघ झाल्याशिवाय राहणार नाही. मुरगूडचे ग्रामीण रुग्णालय पन्नास बेडचे सर्व सोयीनियुक्त करून दाखवू. शेंडा पार्कमधील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय १ हजार बेडचे सुमारे ८०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज करु, असे मुश्रीफ म्हणाले.

के. पी. पाटील म्हणाले की, मंत्री मुश्रीफ यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात मी त्यांच्या सोबत असतो. त्यांच्यामुळेच मला राजकीय जीवनातील अनेक संधी मिळत गेल्या. गोरगरीब जनतेच्या हृदयातील आशीर्वाद हसन मुश्रीफ यांना अखंड यशस्वी करणार आहेत. प्रचंड कामाच्या आणि गोरगरीब जनतेच्या आशीर्वादावर हसन मुश्रीफ पाच वेळा आमदार आणि मंत्री झाले.

प्रवीणसिंह पाटील म्हणाले की, शेतकरी फार मोठे अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ करता येते काय हे मंत्री मुश्रीफ यांनी पाहावे. तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादावर पुढचे आमदार देखील हसन मुश्रीफच असतील. लाल आखाडा कुस्ती संकूल, मुरगूडचे विठ्ठल मंदिर, बिरदेव मंदिर जीर्णोद्धाराचे काम बाकी राहिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी सहकार्य करावे.

भैय्या माने, शितल फराकटे, विजय काळे, दिग्विजय पाटील, सरपंच वेदिका गायकवाड यांची भाषणे झाली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे, सुहासिनीदेवी पाटील, प्रताप उर्फ भैया माने, सूर्यकांत पाटील, शशिकांत खोत, ॲड.जीवन शिंदे, विकास पाटील, मनोज फराकटे, धनाजीराव देसाई, उमेश भोईटे, प्रवीणसिंह भोसले, देवानंद पाटील, शामराव पाटील, रंगराव पाटील, रणजीत सूर्यवंशी, जयदीप पवार, वसंतराव शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

ॲड. सुधीर सावर्डेकर यांनी स्वागत, प्रा. चंद्रकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा 

Back to top button