कोल्हापूरचे जंगल वाघांसाठी पूर्णपणे पोषक नाही | पुढारी

कोल्हापूरचे जंगल वाघांसाठी पूर्णपणे पोषक नाही

कोल्हापूर, सागर यादव : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील जंगल परिसरात वाघांचा वावर आहे. याबाबतच्या अनेक पाऊलखुणा उपलब्ध आहेत. मात्र हे जंगल वाघांसाठी पूर्णपणे पोषक नसल्याने तेथे वाघ आपली बछडी जन्माला घालत नसल्याची माहिती वनविभागाचे उपवन संरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम घाटातील कर्नाटककडून येणार्‍या तिलारी, आंबोली, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, चांदोली या पट्ट्यातून वाघांची ये-जा सुरूच असते. शिकारीला आळा, वनक्षेत्रात खाणकाम बंदी, अतिक्रमण निर्मूलन यामुळे वाघांची ये-जा वाढली आहे. मात्र तृणभक्षक जनावरांचा अभाव असल्याने खाद्याच्या कमतरतेमुळे सद्य:स्थितीत रहिवासी वाघांची संख्या नसली तरी दक्षिणेकडून स्थलांतरित वाघ ये-जा करत असल्याचे जी. गुरुप्रसाद यांनी सांगितले.

पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असणार्‍या वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाच्या संरक्षणासाठी चालना देणे, व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे या उद्देशाने जागतिक व्याघ्र दिन सुरू करण्यात आला. तृणभक्षी प्राणी विकास कार्यक्रम अंतर्गत व्याघ्र प्रकल्पात चितळांचे यशस्वी स्थानांतरण करण्यात आले आहे. वाघांचे खाद्य असणार्‍या तृणभक्षी प्राण्यांच्या वाढीसाठी बारमाही पर्यायी गवत व वनस्पतींची उपलब्धता केली जात आहे. पाण्यासाठी कृत्रिम पाणस्थळे निर्माण केली जात आहेत. कोअर आणि बफर क्षेत्रात संरक्षण रस्त्यांची निर्मिती व डागडुजी करण्यात आली आहे. वन्यजीव अधिवास विकास कार्यक्रम अंतर्गत हजारो हेक्टरवर गवत कुरणांचे व्यवस्थापनाचे काम सुरू आहे.

‘सह्याद्री व्याघ्र’ची कामगिरी उंचावली

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. गाभा क्षेत्रात येणारे कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. या प्रकल्पाचे जंगल हे सह्याद्रीतील उर्वरित घनदाट व चांगल्या श्रेणीतील शिल्लक राहिलेले जंगल आहे. या पश्चिम घाटात सन 2010 सुरू करण्यात आलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने ‘फेअर’, ‘गुड’नंतर आता ‘व्हेरी गुड’ श्रेणी प्राप्त केली आहे. व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन अहवालानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची नोंद ‘खूप चांगले’ (very Good)) श्रेणीत झाली आहे. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची कामगिरी उंचावली आहे.

Back to top button