कोल्हापूर : गजापूर येथील शाळेला गळती; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान | पुढारी

कोल्हापूर : गजापूर येथील शाळेला गळती; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

सुभाष पाटील

विशाळगड: गजापूर (ता. शाहूवाडी) येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला गळती लागली असून मुसळधार पावसामुळे वर्गात पाणीच पाणी साचले आहे. मुलांना बसण्यास जागा नाही. इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे शाळा दुरुस्ती होईपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे, अशी माहिती माजी सरपंच संजयसिंह पाटील यांनी दिली.

गजापूर येथील बाजीप्रभू विद्या मंदिर शाळेची इमारत १९२० मध्ये बांधली आहे. ७ वर्ग ४ खोल्यात बसविले जातात. खोल्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. दरवर्षीच्या गळतीमुळे शाळा मोडकळीस आली आहे. शाळेत पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात ५८ विद्यार्थी आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शाळेच्या छताला गळती लागल्याने वर्गात पाणीच पाणी साचत असल्याने बसायला जागाच नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेची दुरुस्ती होत नसल्याने व शाळेकडे दुर्लक्ष होत असल्याने पाल्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत शाळा दुरुस्त करत नाहीत, तोपर्यंत शाळेत मुले पाठविणार नाही, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून गजापूर पैकी साईनाथ पेठ येथील दोन घरात या मुलांचे ज्ञानार्जनाचे काम सुरू आहे. येथील मुख्याध्यापक २३ जूनपासून शाळेत हजरच नाहीत, याला जबाबदार कोण? अशा शिक्षकाला शिक्षण विभाग पाठीशी का घालत आहे. त्यातच शाळेला लागलेली गळती, धोकादायक इमारत या अवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेणार कसे? असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे. या बाबीचा गांभीर्याने विचार करून मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इमारतीची गळती काढण्याची मागणी होऊ लागली आहे.

शिक्षणाचा खेळखंडोबा

शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यावर भर दिला असल्याने यावर जिल्ह्यात शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करीत आहे. यामध्ये शाळा खोल्यांची दुरुस्ती, संरक्षक भिंती, नवीन इमारत, स्वच्छतागृह, यासह अनेक प्रकारची कामे शासन ठेकेदाराकरवी पूर्ण करून घेत असते. कामांसाठी मंजूर झालेल्या निधीमधून ठेकेदार थातुर-मातूर आपले काम करून मोकळे होतात. काही महिन्यातच या कामांचा खेळखंडोबा होत असतो.

जीर्ण इमारती धोकादायक

जिल्ह्यातील अनेक शाळांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे वापरासाठी बंद केल्या असल्या तरी शाळेचे विद्यार्थी त्याच ठिकाणी खेळतात. त्यामुळे या जीर्ण इमारती निर्लेखीत करून पाडण्याची परवानगी जिल्हा परिषदेने दिली पाहिजे.

 

दुरुस्तीची कामे हाती घ्या, अन्यथा…

शाळेची मोठी दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी वर्गात साठते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून प्रशासनाने गांभीर्याने विचार करून दुरुस्तीची कामे हाती घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.

– निखिल नारकर, युवा सेना उपतालुका प्रमुख, शाहूवाडी

हेही वाचा 

Back to top button