कोल्हापूर : अलमट्टी धरणाबाबत समन्वय, सध्या पुराचा धोका नाही | पुढारी

कोल्हापूर : अलमट्टी धरणाबाबत समन्वय, सध्या पुराचा धोका नाही

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे पंचगंगेची पाणी पातळी गुरुवारी 45 फुटांवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे अलमट्टी धरणाशी समन्वय साधला जात असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी सांगितले. अलमट्टी धरणातील पाणी पातळी 517.5 मीटरपर्यंतच राहील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या कमी आहे. धरणातूनही विसर्ग सुरू आहे, यामुळे सध्या धोका नसल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पंचगंगेची धोका पातळी 43 फूट आहे. पंचगंगेची बुधवारी पाणी पातळी 40 फुटांवर होती. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, त्याचे दुपारपर्यंत पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. त्यातून होणार्‍या विसर्गामुळे गुरुवारी सकाळपासून पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पंचगंगा धोका पातळी ओलांडण्याचीही भीती आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरण व हिप्परगे बंधार्‍याच्या पाणीसाठ्यावर कृष्णा व पंचगंगेची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. यामुळे अलमट्टी धरणातील पाण्याचा योग्य प्रमाणात विसर्ग सुरू राहिला, धरणाची पाणी पातळी 517.5 मीटरपर्यंत राहिली तर पंचगंगेच्या आणि कृष्णेच्या पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीने पुढे सुरू राहतो. यामुळे पंचगंगेचा पुराचा धोका कमी राहतो.

याबाबत महाराष्ट्र शासन व कर्नाटक राज्याच्या सिंचन विभागामध्ये समन्वय साधला जात आहे. याकरिता वरिष्ठ स्तरावर अधिकार्‍यांची नियुक्तीही यापूर्वीच करण्यात आली आहे. त्या अधिकार्‍यांच्या संपर्कातही स्थानिक अधिकारी सातत्याने आहेत. अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517.5 मीटरच्या वर जाणार नाही, ती स्थिर राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी रेखावार यांनी सांगितले. या काळामध्ये अजून पाऊस पडल्यास पुढे पाणीपातळीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून वेळेत आवश्यक त्या ठिकाणी स्थलांतरण प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्याच्या स्थितीत पूरबाधित क्षेत्रात तसे शेतात नागरिकांनी जाऊ नये, या क्षेत्रात कामे करू नयेत. स्थलांतरासाठी आवश्यक तयारी करून प्रशासनाच्या सूचनेनुसार घर सुरक्षित बंद करून नागरिकांनी बाहेर पडावे. प्रशासनाकडून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात मिळून संभाव्य 478 निवारागृहे तयार करण्यात आली आहेत. नागरिकांना निवारा, अन्न, पाणी, स्वच्छतागृह, औषधे व अनुषंगिक साहित्य आदी आवश्यक सुविधा दिल्या जात आहेत. पशुधनासाठी निवारा, चारा याचीही सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत 65 कुटुंबांतील 319 जणांचे स्थलांतरण झाले आहे. 127 जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत. महापालिकेने 15 कुटुंबांतील 51 जणांना स्थलांतरित केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम प्रशासनाकडून कार्यान्वित

आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, जीवितहानी होऊ नये, यासाठी तातडीने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आवश्यक संदेश पोहोचविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बसविण्यात आलेल्या पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीमचा वापर करण्यात येत आहे. पूरस्थितीमुळे बाधित होणार्‍यांची संख्या कमी करणे, जीवितहानी टाळणे हा पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम राबविण्याचा प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी घाबरून न जाता वेळेत स्थलांतर करावे

पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होऊन ती धोका पातळीवर वाहण्यास सुरुवात झाल्यावर कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागातील गावांमध्ये पुराचे पाणी शिरते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता वेळेत पाणी येण्याआधीच स्थलांतर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही रेखावार यांनी केले.

Back to top button