Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतात तरी कसे? जाणून घ्या अचंबित करणारे तंत्रज्ञान

radhanagari dam
radhanagari dam
Published on
Updated on

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला असून आज सकाळी ८.१५ वाजता राधानगरी धरणाचा सहा नंबरचा एक दरवाजा उघडला आहे. (Radhanagari Dam ) एकूण विसर्ग २,८२८ क्यूसेक सुरु आहे. तुम्हाला माहितीये का, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कसे उघडतात? (Radhanagari Dam )

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची दूरद़ृष्टी आणि कल्पकतेतून राधानगरी धरणाचे बांधकाम करण्यात आले. हे धरण भोगावती नदीवर उभारण्यात आले. राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांचे तंत्रज्ञान अनेक वर्षांनंतरही कायम आहे. हे तंत्रज्ञान नागरिक आणि देशभरातील अनेक अभियंत्यांसाठी प्रेरणादायी आहे. जो कुणी धरण पाहिल, त्याला हे धरण अचंबित करणारे ठरते. महान अभियंते आणि नवभारताचे निर्माते भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांनी या स्वयंचलित दरवाजांची रचना केली होती. आजही राधानगरी धरण येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि एम. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची साक्ष स्मृती केंद्राच्या ठिकाणी पाहता येईल.

राजर्षी शाहू महाराज यांच्या कल्पकतेतून शंभर वर्षांपूर्वी राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचे स्थापत्यशास्त्र साकारले गेले. एम विश्वेश्वरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली देशात ग्वाल्हेर, म्हैसूरसह खडकवासला आणि राधानगरी धरणावर (कोल्हापूर) येथे ही यंत्रणा बसविण्यात आली.

गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित पाणी सोडण्याची व्यवस्था आणि पाण्याच्या दबावावर उघड-झाप होणार्‍या स्वयंचलित दरवाजांचे वैशिष्ट्य असणारे राधानगरी धरण आहे. राधानगरी धरणाचे आजही जलसिंचन आणि जलविद्युत निर्मितीचे कार्य अखंडपणे करत आहे.
राजर्षी शाहू महाराज १९०२ मध्ये परदेश दौर्‍यावरून भारतात परतले. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात धरण बांधण्याचा निर्धार केला. १०० वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व त्यांनी ओळखले. जनतेला दुष्काळ अथवा पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांनी विहिरी, तलाव, छोटे बंधारे बांधले. पुढे कोल्हापूर जिल्ह्याला समृद्ध बनविण्यासाठी राधानगरी धरण बांधले. राजर्षी शाहूंच्या दूरद़ृष्टीच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याची कामगिरी त्यावेळचे अभियंता दाजीराव अमृत विचारे यांनी केली.

हे धरण राजर्षी शाहूंचे जीवन ध्येय

फेब्रुवारी १९०८ मध्ये धरण परिसरातील फेजिवडे गावात राधानगरी ही नवी पेठ वसवून महालाचे ठाणे सुरू केले. १ मार्च, १९०८ रोजी राधानगरी महालाच्या प्रशासकीय कामांची सुरुवात झाली. २३ नोव्हेंबर, १९०८ रोजी सुरुवातीला ३ लाखांचा निधी मंजूर केला होता.
मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड लिमिंग्टन, पोलिटिकल खात्यातील सर आर्चिबाल्ड हंटर, कोल्हापूर संस्थानचे माजी पॉलिटिकल एजंट लेफ्टनंट कर्नल डब्ल्यू. बी. फेरीस, सर डब्ल्यू. टी. मॉरिसन, मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम, मुंबई सरकारचे प्रमुख इंजिनिअर ए. हिल अशा अनेकांशी पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष धरण क्षेत्राची पाहणी करण्यासाठीही बोलावले होते.

विचारे यांना इनाम म्हणून जमीन दिली

२२ सप्टेंबर १९०८ रोजी राधानगरी धरणाच्या योजनेस राजर्षी शाहू महाराज यांनी मंजुरी दिली. त्याच वर्षी दसर्‍याच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष काम सुरु केले. या योजनेचे शिल्पकार इंजिनिअर रावसो दाजीराव अमृतराव विचारे (एल.सी.ई.एम.एल.सी. कोल्हापूर स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर) होते.

कोल्हापूर शहरापासून ३५ मैल अंतरावर राधानगरी गावाच्या पुढे भोगावती नदीचा प्रवाह अडवून हे अद्भुत धरण बांधले आहे. बांधकाम सुरू असताना स्वत: शाहू महाराज चौपाईवर घोंगडे टाकून बसून प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष द्यायचे.

महाराजांचे धाकटे बंधू पिराजीराव ऊर्फ बापूसाहेब घाटगे, चिटणीस नेरुरकर, कृष्णा भोसले, नाना भोसले, नारायण जाधव, शंकर भोसले, कृष्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो हात धरण उभारणीच्या कामात गुंतले होते. राधानगरी धरणाची योजना तयार केल्याबद्दल आणि सरकारी नोकरी इमानेएतबारे केल्याबद्दल दाजीराव विचारे यांना कसबा करवीरमध्ये राजर्षी शाहूंनी जमीन इनाम दिली होती (10 मे 1911 चा ठराव).

सर एम विश्वेश्वरय्या यांचे मार्गदर्शन

१९०९ मध्ये धरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. १९१८ पर्यंत १४ लाख रुपये खर्चून धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. हे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले. पुढे निधीच्या कमतरतेमुळे आणि राजर्षी शाहूंच्या निधनामुळे (१९२२) राजी हे काम काही काळ रखडले. मात्र छत्रपती राजाराम महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत धरणाचे अपुरे काम पुन्हा गतीने हाती घेतले.

भारतीय अभियांत्रिकी सेवेतील इंजिनिअर पांडुरंगराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाचे पुढील काम सुरू झाले. १९४१ मध्ये जागतिक कीर्तीचे वास्तुशास्त्रज्ज्ञ सर विश्वेश्वरय्या यांना पाहणी व मार्गदर्शनासाठी धरण क्षेत्रावर बोलावून घेतले. छत्रपती राजाराम महाराज यांच्या अकाली निधनानंतर काही काळ काम पुन्हा रखडले.

पुढे छत्रपती शहाजी महाराजांच्या काळात धरणाच्या कामाला गती आली. १९४९ ते ५५ या काळात २.४५ लाख खर्च करून धरणाची उंची १२६ फुटांपर्यंत वाढविण्यात आली. यात ८३६२ दशलक्ष घनफूट पाणी साठवता येत असे. यासाठी रिजन्सी कौन्सिलचे सुधारणा सचिव डॉ. जे. पी. नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले. सन १९५७ ला धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news