छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले दागिने गहाळ; संभाजीराजेंनी दिला इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले दागिने गहाळ; संभाजीराजेंनी दिला इशारा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता, काही ऐतिहासिक महत्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे समजत आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्राद्वारे केली आहे.

यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ऑन कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा, गहाळ दागिन्यांची संपूर्ण चौकशी करावी व संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा स्वराज्याच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

अलंकार गायब झालेला कालावधी निश्चित होईना

तुळजाभवानी देवीच्या दाग दागिन्यांची मोजणी आणि मूल्यमापन करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. या संदर्भात देण्यात आलेल्या अहवालामध्ये देवीच्या अलंकाराच्या डब्यामधील डबा क्रमांक ६ आणि ८ मध्ये नोंदणी आणि अलंकार याच्यामध्ये तफावत आढळून आल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. सदर दागिने केव्हा गायब झालेले आहेत या संदर्भात कोणताही अंदाज बांधता आलेला नाही. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

तुळजाभवानी देवीची दागिने मंदिराच्या जामदार खाण्यामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये ठेवले जातात. परंपरागत पद्धतीने दागिने तुळजाभवानी देवीच्या अंगावर चढवणे आणि काढल्यानंतर ते पुन्हा जामदार खाण्यापर्यंत जमा करण्याची प्रक्रिया अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि मनुष्यबळ कार्यरत आहे. परंतु दागिन्यांची मोजणी आणि मूल्यमापन करण्याची प्रक्रिया आजपर्यंत न झाल्यामुळे सदर दागिने केव्हा गायब झाले आहेत याचा अंदाज मोजमाप करणारी समिती किंवा अधिकारी यांना आजच्या घडीला आलेला नाही. १९६३, १९९९ आणि २०१० अशा वेगवेगळ्या मौल्यवान दागिन्यांच्या यादी असून देवीच्या अलंकाराचे एकूण आठ डबे आहेत. यामधील सहा क्रमांकाचा डबा आणि आठ क्रमांकाचा डबा याच्यामध्ये तफावत आढळून येत असल्याचे सांगितले जाते. याला अधिकृत दुजरा मिळालेला नाही.

मंदिर संस्थान अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष

दोन महिन्यापूर्वी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी यासंदर्भात पुजारी मंडळाचे अध्यक्ष आणि अधिकारी तसेच मुंबई येथील तज्ञ सुवर्णकार यांची समिती बनवून याची सुमारे दीड महिना इन कॅमेरा मोजणी आणि मूल्यमापनाचे काम केले आहे. याचा अहवाल देत असताना या दोन त्रुटी या समितीला जाणवल्या आहेत. यासंदर्भात आगामी काळात तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ यांच्याकडून या संदर्भात कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

७५ प्राचीन नाणी गायब झाल्याची तक्रार

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा सर्व कारभार महसूल खात्याच्या ताब्यात आहे. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार हेच या संस्थानचा कारभार चालवितात. तसेच नगराध्यक्ष आणि आमदार हे पदसिद्ध सदस्य आहेत. पूर्वीपासून विश्वस्त मंडळाची ही रचना निश्चित आहे. यापूर्वीचे तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी याच जामदारखान्यामध्ये असणारे ७५ प्राचीन नाणी गायब झाल्याची तक्रार केली होती. त्याचा देखील तपास पूर्ण होऊन त्या संदर्भात तत्कालीन चौकशी समितीने ठपका ठेवून कारवाई केलेली आहे. मंदिर संस्थानचा कारभार करणारे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हेच येथे होणाऱ्या सर्व कारभारासाठी जबाबदार असून या मंडळीकडून आगामी काळात कोणती माहिती उपलब्ध होते याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news