पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे; राधानगरी धरण 91 टक्के भरले, बालिंगा पुलावरील वाहतूक बंद | पुढारी

पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे; राधानगरी धरण 91 टक्के भरले, बालिंगा पुलावरील वाहतूक बंद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी काहीशी उसंत घेतली. पावसाचा जोर कमी झाला असला, तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगेने सोमवारी पहाटे इशारा पातळी ओलांडली असून, आता तिची वाटचाल धोका पातळीच्या दिशेने सुरू आहे. राधानगरी धरण सोमवारी रात्री 91 टक्के भरले आहे. मंगळवारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून, त्यातून विसर्ग सुरू झाला तर कोल्हापूरला महापुराचा धोका आहे. 83 बंधारे पाण्याखालीच असून, 59 मार्गांवरील वाहतूक बंदच होती.

बालिंगा येथील भोगावती नदीच्या पुलावरून होणारी वाहतूक प्रशासनाने बंद केल्याने दिवसभर गोंधळाचे वातावरण होते. दैनंदिन व्यवहारासाठी ये-जा करणार्‍या नागरिकांना याचा मोठा फटका बसला.

जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाची उघडीप होती. काही काळ सूर्यदर्शनही होत होते. दुपारनंतर काही भागांत पावसाला पुन्हा सुरुवात झाली.
रात्रीही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गेल्या पाच दिवसांच्या तुलनेत सोमवारी पाऊस कमी झाला असला, तरी पंचगंगेच्या पाणी

पातळीत वाढ होत आहे. सोमवारी पहाटे पाच वाजता पंचगंगेने 39 फूट ही इशारा पातळी गाठली. दुपारी चार वाजता पंचगंगेची पाणी पातळी 40 फुटांवर गेली. रात्री नऊ वाजता पाणी पातळी 40.2 फूट होती. 43 फूट ही धोका पातळी असून, पंचगंगा संथगतीने त्या दिशेने सरकत आहे. पावसाचा जोर वाढला तर दोन दिवसांत धोका पातळी गाठेल, अशी शक्यता आहे. यामुळे कोल्हापूर शहरासह पंचगंगा नदीकाठावरील गावांत पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

पंचगंगेच्या पातळीत वाढ होत असल्याने पाणी आता नागरी वस्तीकडे येऊ लागले आहे. पंचगंगेचे पाणी शिवाजी पूल ते गंगावेस या रस्त्याने आता पुढे जामदार क्लबच्या जवळ आले आहे.

राधानगरी धरण सोमवारी दुपारी चार वाजता 90 टक्के भरले होते. रात्री त्याच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ झाली. मंगळवारी रात्री अथवा बुधवारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी शक्यता आहे. यामुळे दोन दिवसांत धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल. यासह कुंभी आणि कासारी धरणांतूनही विसर्ग होण्याची शक्यता आहे. यामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ होणार असून, पाणी पातळी दोन ते तीन फुटांनी वाढू शकते, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा दूध संकलनावर आता परिणाम होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी दूध संकलन ठप्प झाले आहे. दूध संकलन करणार्‍या वाहनांना काही मार्ग बदलावे लागले आहेत.

जिल्ह्यात सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत प्रमुख सर्व पंधरा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. घटप्रभा धरण परिसरात तब्बल 328 मि.मी. पाऊस झाला. पाटगाव धरण परिसरात 295 मि.मी., जांबरेत 219 मि.मी. पाऊस झाला. राधानगरी धरण क्षेत्रात 142 मि.मी., तुळशीत 150 मि.मी., कासारीत 171 मि.मी., कडवीत 145 मि.मी., जंगमहट्टीत 176 मि.मी., कोदेत 149 मि.मी., चिकोत्रात 120 मि.मी., चित्रीत 110 मि.मी. पावसाची नोंद झाली. वारणेत 76, दूधगंगेत 97, कुंभीत 85, तर आंबेओहोळमध्ये 75 मि.मी. पाऊस झाला.

जिल्ह्यात सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 40 मि.मी. पाऊस झाला. चंदगडमध्ये सर्वाधिक 88 मि.मी. पाऊस झाला. भुदरगडमध्ये 62, आजरा आणि राधानगरीत प्रत्येकी 57, शाहूवाडीत 50, पन्हाळ्यात 44, गगनबावड्यात 42, गडहिंग्लजमध्ये 34, करवीरमध्ये 29, कागलमध्ये 26, हातकणंगलेत 19 आणि शिरोळमध्ये 11 मि.मी. पावसाची नोंद झाली.

बालिंगा पुलावरील वाहतूक केली बंद; नागरिकांना फटका

पावसाचा जोर कमी झाल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर आलेले पाणी ओसरले. मात्र, याच दरम्यान भोगावती नदीवर बालिंगा येथे असलेल्या पुलाजवळ पाणी पातळी वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या पुलावरील वाहतूक बंद केली. यामुळे दिवसभर या ठिकाणी गोंधळाचेच वातावरण होते. दैनंदिन कामकाजासाठी ये-जा करणार्‍या वाहनधारकांना याचा मोठा फटका बसला.

पोलिस प्रशासनाने अचानक सकाळी या मार्गावरील वाहतूक बंद केली. प्रारंभी हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार अवजड वाहने माघारी पाठविण्यात आली. या ठिकाणी वाहने आल्यानंतर परत मागे घेण्यामुळे परिसरात वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. पर्यायी मार्गावरही पाणी असल्याने अनेकांना कोल्हापुरात येऊन आंबेवाडी, चिखली, प्रयाग, यवलूज, खुपीरेमार्गे कोल्हापूर-गगनबावडा रस्ता आणि त्यानंतर पुढे असा प्रवास करावा लागला.

सायंकाळनंतर पुलावरून होणारी दुचाकीचीही वाहतूकही थांबविण्यात आली. यामुळे वादावादीचेही प्रसंग घडले. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी या मार्गावरून वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्ववत झाली नव्हती.

Back to top button