कोल्हापूर : पूरप्रवण भागात स्थलांतराच्या नोटिसा | पुढारी

कोल्हापूर : पूरप्रवण भागात स्थलांतराच्या नोटिसा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पूरप्रवण भागातील सुमारे दहा हजारांवर कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. पूर पातळीत वाढ होत गेली तर नागरिकांचे स्थलांतर केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असून जिल्ह्यात 600 ठिकाणी निवारा केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 129 गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. 2005, 2006 सह 2019 व 2021 या साली महापुराची स्थिती गंभीर बनली होती. या कालावधीत पूरबाधित गावांची संख्या 400 हून अधिक झाली होती. दरवर्षी पुराने बाधित होणार्‍या गावांची संख्या वाढतच चालली आहे. पूरस्थिती गंभीर झाल्यानंतर अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला दमछाक करावी लागते. वेळही वाया जातो. यातून दुर्घटना होण्याचीही भीती असते. या सर्व पार्श्वभूमीवर संभाव्य पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पाणी पातळीत वाढ सुरू आहे. धरणातून विसर्ग नसतानाही पाच दिवसांत झालेल्या पावसाने पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे. येत्या एक-दोन दिवसांत धरणे पूर्ण क्षमतेने भरून त्यातूनही विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या 60 हून अधिक मार्ग बंद आहेत. 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्थलांतरासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नोटिसा दिल्या आहेत.

करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले, चंदगड आदी तालुक्यांत प्रामुख्याने नोटिसा देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. करवीर तालुक्यातील संभाव्य पूरबाधित चिखली, आंबेवाडी आणि आरे या तीनही गावांतील सुमारे अडीच हजारांवर कुटुंबांना नोटिसा देण्यात आल्याचे प्रांताधिकारी हरीष धार्मिक यांनी सांगितले. पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यात पुराने बाधित होणार्‍या कुटुंबांची संख्या कमी असली तरी पुराचा होणारा परिणाम तसेच भूस्खलन आदीचा धोका असल्याने दीड हजारांवर कुटुंबांना नोटिसा देण्यात आल्याचे पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगितले.

ग्रामीण भागासह शहरी भागातही अनेक ठिकाणी पूरप्रवण क्षेत्र आहे. अशा भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. महापालिकांना अशा कुटुंबांसह पूरप्रवण क्षेत्रात असलेली रुग्णालये, विविध आस्थापना आदींनाही नोटिसा दिल्या आहेत.

संभाव्य निवारा केंद्रे

जिल्ह्यात पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांसाठी विविध ठिकाणी निवारा केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. त्याचेही नियोजन सुरू आहे. त्यानुसार करवीर तालुक्यात 120, गगनबावड्यात 2, शाहूवाडी 27, आजरा 15, गडहिंग्लज 26, चंदगड 30, शिरोळ 50, पन्हाळा 41, राधानगरी 2, भुदरगड 23, कागल 40, इचलकरंजी महापापलिका 63 आदी निवारा केंद्रे उभारली जाणार आहेत.

जनावरे स्थलांतरासाठी नियुक्त्या

संभाव्य पूरबाधित क्षेत्रातील जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी त्यांची वाहनातून ने-आण करावी लागणार आहे. त्याकरिता वाहने, त्याचे भाडे आदींसाठी समन्वयक म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाने अधिकारी, कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

Back to top button