कोल्हापूर : हुल्लडबाजांच्या तर्‍हा, पर्यटनाचे वाजतात बारा | पुढारी

कोल्हापूर : हुल्लडबाजांच्या तर्‍हा, पर्यटनाचे वाजतात बारा

सागर यादव

कोल्हापूर  : वर्षा पर्यटनाला आता हुल्लडबाजीचे ग्रहण लागू लागले आहे. कोणतेही नियम न पाळणारी टोळकी वर्षा पर्यटनस्थळी दारू पिऊन धिंगाणा घालत आहेत. काही घटनांमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अनेकजण कायमचे जायबंदी झाले असतानाही हुल्लडबाजीचे प्रकार बिनधास्त सुरूच आहेत.

रिमझिम बरसणार्‍या पावसाच्या सरी झेलत हिरव्यागार निसर्गात मनसोक्त फिरणे, उंचावरून कोसळणार्‍या धबधब्यात बिनधास्त मस्ती करणे, निसर्गसंपन्न पठारे, स्फूर्तिदायी इतिहासाची साक्ष देणारे गडकोट-किल्ले यासह विविध ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. वीकएंडला तर वर्षा पर्यटकांची गर्दी हजारांच्या संख्येत पोहोचते. मात्र हुल्लडबाजीमुळे सर्वसामान्य पर्यटकांसह स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पोलिस व स्थानिक यंत्रणा वेठीस धरली जात आहे. या हुल्लडबाजीचा पर्यटन व्यवसायावरही परिणाम होऊ लागला आहे.

तरुणांची टोळकी आघाडीवर

वर्षा पर्यटनासाठी जाणार्‍या हुल्लडबाज पर्यटकांच्या अनेक तर्‍हा पाहायला मिळतात. पर्यटनस्थळांवर मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावणे, ढोल-ताशे वाजविणे, आरडाओरडा व टिंगल-टवाळी यांसारखे प्रकार सुरू असतात. बर्‍याचदा वादावादी, हाणामार्‍या, छोटे-मोठे अपघात घडतात. पाय घसरून पडल्याने पर्यटकांचा जीव धोक्यात येतो. शिवाय पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात धुके असते, दरडी कोसळण्याचा धोका अधिकच असतो.

राधानगरी, काळम्मावाडी धरण, विविध धबधबे, गडकिल्ले, पठार यांसह पर्यटनासाठी राज्यभरातून पर्यटक या ठिकाणी भेट देतात. मात्र अनेकवेळा हुल्लडबाजीचे गालबोट लागते.

Back to top button