वनसंवर्धन दिन विशेष : झाड ठरतंय कुटुंबाचा आधार… | पुढारी

वनसंवर्धन दिन विशेष : झाड ठरतंय कुटुंबाचा आधार...

कोल्हापूर, सागर यादव : घराबरोबरच विक्रीसाठीही कडीपत्ता उपयोगी ठरतो. चाफ्यासह विविध फुले-बेल घरच्या देवाबरोबरच मंदिरात विक्री केली जातात. आंबे-जांभळ-भोकर-बेल-केळे यांसह फळभाज्या घरातील उपयोगाबरोबरच शेजार-पाजारच्या लोकांचीही गरज भागवतात. यामुळे प्रत्येक झाड अनेक कुटुंबांचा आधार ठरत आहे. यामुळे पर्यावरणाच्या जतन-संवर्धन-संरक्षणासह लोकांना उपयोगी ठरणार्‍या वृक्षांची लागवड काळाची गरज आहे.

वनसंवर्धन दिन (23 जुलै) हा दिवस निसर्गातील झाडे, डोंगर, नद्या, वने, प्राणी, पक्षी यांचे संवर्धन आणि समाजात नैसर्गिक साधनसंपत्तीविषयी जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसामग्रीचा अमानुष वापर यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रचंड प्रमाणात जंगलतोडीमुळे ग्लोबल वॉर्मिंग, भूस्खल्लन, निसर्गचक्रात बदल, ढगफुटीसह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे एकूणच सजीव सृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे रोखण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण अत्यावश्यक असून यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण काळाची गरज बनली आहे. यामुळे उपलब्ध जागेनुसार प्रत्येकाने झाड लावणे कर्तव्य झाले आहे.

बहुउपयोगी झाडे …

वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, कडुलिंब, पुत्राजीवी, अशोक, शिरीष, आंबा, सीताफळ, जांभुळ, सप्तपर्णी, पेरू, बोर, आवळा, चिंच, बकुळ, रेन ट्री (वर्षावृक्ष), जास्वंद, पारिजातक, रातराणी, मेहंदी, तुळस, हळद, पळस, चारोळी, कोरफड, शेर, रुई, अश्वगंधा, निवडुंगाचे प्रकार.
(संदर्भ : निसर्ग सेवक – मारुती चित्तमपल्ली)

एक झाड काय करू शकते…

एक सामान्य झाड वर्षभरात सुमारे 20 किलो धूळ शोषते. दरवर्षी सुमारे 700 किलो ऑक्सिजन तयार करते. दरवर्षी 20 टन कार्बन डायऑक्साइड शोषते. उन्हाळ्यात एका मोठ्या झाडाखाली तापमान सरासरी 4 अंशांपर्यंत कमी राहते. 80 किलो पारा, लिथियम, शिसे आदी विषारी धातूंचे मिश्रण शोषण्याची क्षमता. घराजवळील एक झाड अकॉस्टिक वॉलसारखे काम करते. म्हणजे आवाज/ध्वनी शोषते.

घराजवळील झाडांमुळे आयुष्य वाढ

विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या अभ्यासानुसार ज्यांच्या घरांजवळ झाड असते, त्यांना तणावाची, नैराश्याची शक्यता कमी असते. कॅनडाचे जर्नल ’सायंटिफिक रिपोर्टस्’नुसार घराजवळ 10 झाडे असली तर आयुष्य 7 वर्षे वाढू शकते. इलिनॉईस विद्यापीठाच्या संशोधनानुसार, घराजवळ झाड असेल तर झोप चांगली लागते, विशेषत: वृद्धावस्थेत.

Back to top button