कोल्हापूर : बाप्पांच्या आगमनासाठी 600 कोटींची उलाढाल शक्य

कोल्हापूर : बाप्पांच्या आगमनासाठी 600 कोटींची उलाढाल शक्य

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाची लगबग घरोघरी सुरू आहे. गणपती बाप्पांच्या आगमनासोबत दरवर्षी बाजारपेठेतही रोजगाराची मोठी संधी चालून येते. दुर्वा, फुलांपासून प्रसादापर्यं, गणेशमूर्तींपासून साऊंड सिस्टीमपर्यंत, गूळ, गव्हापासून चांदीच्या आभूषणांपर्यंत सर्वच बाजारपेठ सज्ज झाली आहे. सहाशे कोटींची उलाढाल यानिमित्ताने होण्याची शक्यता असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे.

गणेशमूर्तींचा 300 कोटींचा टर्नओव्हर

कोल्हापुरी गणेशमूर्तींना पश्चिम महाराष्ट्रासह सीमाभागात मागणी आहे. एक फुटापासून एकवीस फुटांपर्यंतच्या आकर्षक मूर्तीतून मोठी उलाढाल होते. बापट कॅम्प येथे 300 हून अधिक कुटुंबांकडून मोठ्या गणेशमूर्तींची निर्मिती सुरू आहे. तसेच गंगावेश, शाहूपुरी येथील पारंपरिक शाडूच्या छोट्या गणेशमूर्तींची निर्मिती होते. या सर्वांतून सुमारे 300 कोटींची उलाढाल शक्य आहे.

साऊंड सिस्टीमसह पारंपरिक वाद्यांचे अ‍ॅडव्हास बुकिंग

आवाजाच्या मर्यादेचे पालन करून साऊंड सिस्टीमला परवानगी देण्यात आली आहे. गतवर्षीही गणेशोत्सवामध्ये साऊंड सिस्टीमचा दणदणाट पाहायला मिळाला होता. 25 हजारांपासून ते दोन लाखांपर्यंतचे भाडे या साऊंड सिस्टीमसाठी आकारण्यात येते; तर पारंपरिक ढोल-ताशा पथकांनाही मोठी मागणी असून ही उलाढाल कोटींच्या घरात पोहोचते. मंडळांकडून अशा वाद्यांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सध्या सुरु आहे.

प्रसादाची गोडी वाढली

दुधापासून बनलेली मिठाई, खव्याचे मोदक, म्हैसूरपाक, वेगवेगळे लाडू यांची मागणी गणेशोत्सव काळात वाढते. यंदाही मिठाई विक्रेत्यांनी तयारी पूर्ण केली आहे. कोल्हापुरात बाप्पाच्या प्रसादासाठी मागणी होणार्‍या या पदार्थांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. पेढे, मोदक, लाडू या बाप्पाच्या आवडत्या पदार्थांची आवक बाजारात होवू लागली आहे.

नारळ, फुलांची बाजारपेठ सज्ज

घरगुती गणपतीसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींनाही नारळाचे तोरण बांधले जाते. तसेच बाप्पाच्या आवडीचा मोदक बनविण्यासाठी नारळाला मागणी वाढते. कोल्हापुरात कर्नाटक, तामिळनाडू, केरळमधून नारळ दाखल होतो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही आवक वाढली आहे. तसेच कर्नाटकासह शहरालगतच्या ग्रामीण भागात फुलांची लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जास्वंद, जरबेरी, गुलाब, झेंडू, चाफा बाजारात दाखल होणार आहे.

पूजा साहित्याला मागणी

पूजेसाठी लागणारा कापूर, कापूस, उदबत्ती, धूप यासह वेगवेगळ्या प्रकाराचे उद बाजारात आले आहेत. गणेशोत्सव काळात गल्लोघरी धूपारतीतून सुगंध पसरविणार्‍या या साहित्याची बाजारपेठही विशेष आहे. राजस्थान, मध्यप्रदेशातील परप्रांतिय लोकही उद, उदबत्तीचे वेगवेगळे फ्लेवर विक्रीसाठी घेवून फिरत आहेत.

खिरीचे साहित्य तेजीत

गणपत्ती बाप्पाची आवडती खिर बनविण्यासाठी लागणाला सडीचा गहू, खारीक, बदाम, काजू अशा ड्रायफ्रूटची बाजारपेठ सध्या सज्ज झाली आहे. गुळाची आवकही मोठ्या प्रमाणात असून खीरीसाठीचे वेगवेगळे इसेन्स बाजारात उपलब्ध झाले आहेत. गव्हाची खीर, शेवयांची खीर बनविण्यासाठी लागणार्‍या पदार्थांच्या किमतीत यंदा 10 टक्के वाढ झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.

लाईटींगचा झगमगाट

मिरवणूकींतील विद्युत रोषणाई, घरोघरी करण्यात येणारी आरास, मंडपांमधील विद्युत सजावट यावर गणेशोत्सवात मोठा खर्च केला जातो. नवनव्या तंत्रज्ञानाची अशी विद्युत रोषणाई बाजारात आली आहे. लाईटींग माळांमध्ये 50 रुपयांपासून 1 हजार रुपयांपर्यंतच्या माळा उपलब्ध आहेत. तसेच एलईडी बल्ब, शार्पी यांचीही मागणी वाढली आहे.

चांदीच्या आभूषणांना पसंती

गणेशमूर्तींना आणखी उठावदार करण्यात चांदीच्या आभूषणांचा हातभार लागतो. किरीट, त्रिशूळ, मोदक, बाळी, दुर्वा, जास्वंद फुले, कमळ फुले, उपरणे, प्रभावळ, चौरंग, हार अशी आभूषणे बाजारात उपलब्ध आहेत. गुजरी, महाद्वार रोड, स्टेशन रोड, शाहूपुरी, राजारामपुरीतील सराफी पेढ्यांवर ही आभूषणे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news