सोनेरी-चंदेरी पहाट कोल्हापूरमध्ये मंगळवारी रंगणार; ‘पुढारी आणि मनीषा निश्चल्स महक’ यांचा उपक्रम | पुढारी

सोनेरी-चंदेरी पहाट कोल्हापूरमध्ये मंगळवारी रंगणार; ‘पुढारी आणि मनीषा निश्चल्स महक’ यांचा उपक्रम

कोल्हापूर : ‘पुढारी’ आणि मनीषा निश्चल्स महक यांच्या संयुक्त विद्यमाने सोनेरी-चंदेरी पहाट या पंचतारांकित गंधर्वांच्या अजरामर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भावसंगीताचे किमयागार व सुवर्णकाळाचे शिल्पकार कवी मंगेश पाडगावकर, गायक अरुण दाते, कवयित्री शांता शेळके, संगीतकार श्रीनिवास खळे व संगीतकार यशवंत देव या पंचतारांकित गंधर्वांनी अजरामर केलेल्या गीतांची ‘सोनेरी-चंदेरी’ दिवाळी पहाट हा कार्यक्रम मंगळवारी (दि. 2 नोव्हेंबर) रोजी सकाळी 6.00 वाजता कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे रंगणार आहे. प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांच्या महक प्रस्तुत, माणिक एंटरटेन्मेंट निर्मित ‘सोनेरी-चंदेरी’ची दिवाळी पहाट मैफल श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. दिवस तुझे हे फुलायचे, स्वर आले दुरूनी, तुझे गीत गाण्यासाठी, गोरी गोरी पान, काय बाई सांगू अशी अवीट गाणी या मैत्रिणीमध्ये सादर केली जातील. सोबतच मंगेश पाडगावकर यांच्या निवडक कविता, पाडगावकर आणि अरुण दाते यांच्या आयुष्यातील रंजक किस्से अंजली पाडगावकर-कुलकर्णी आणि अतुल अरुण दाते यांच्याकडून ऐकण्याची पर्वणी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. ‘सोनेरी-चंदेरी’च्या या मैफलीत मनीषा निश्चल यांच्यासह जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी हे तिघे गाणी सादर करणार असून, यश भंडारे, मंदार देव, अपूर्व द्रविड, जीवन कुलकर्णी, रोहन वनगे हे वाद्यांवर साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमासाठी महाजन पब्लिसिटी यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे पासेस दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते सायं. 6 पर्यंत टोमॅटो एफ. एम. कार्यालय, बागल चौक, वसंत प्लाझा, कोल्हापूर येथे उपलब्ध राहतील. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य राहील.
अधिक माहितीसाठी संपर्क 9765566377, 561626665.

Back to top button