कोल्हापूर : वारणा काठावर मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग | पुढारी

कोल्हापूर : वारणा काठावर मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

दानोळी; पुढारी वृत्तसेवा : गेली दोन दिवस परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वारणा नदीची पाणी पातळी वाढली आहे. पाणी पात्राबाहेर आल्याने शेतकऱ्यांत नदीवरील मोटरी काढण्याची लगबग सुरु आहे. अनेक दिवस हुलकावणी दिलेल्या पावसाने अचानक दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

या परिसरात गेले अनेक दिवस पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत होते. पण दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. परिसरातील शेतीची मशागत पूर्ण झाल्यापासून शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. सुरु असलेल्या संततधार पावसाने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या परिसरातील शेती वारणेच्या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे वारणा काठावर शेकडो मोटरींच्या सहाय्याने शेतीसाठी पाणी उपसा केला जातो. पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे मोटरी काढण्यासाठी शेतकरी वर्गाची लगबग सुरु आहे.

दानोळी हद्दीतून परिसरातील आदर्शगाव, निमशिरगाव, चिपरी, जैनापूर, तमदलगे, तारदाळ, खोतवाडी, यड्राव आदी गावातील शेतीला आणि पिण्यासाठीही वारणा काठावर मोटरी बसवून पाणी नेले आहे. दानोळीकरांच्या शेकडो मोटरी वारणा काठावरून शेतीसाठी पाणी उपसा करतात. पाणी पातळी वाढल्याने मोटरी बुडण्याची भीती निर्माण झाल्याने मोटरी काढण्यासाठी धावपळ सुरु आहे. वैयक्तिक आणि सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी उपसा केला जातो. त्यामुळे मोटारींची संख्या आणि मोटारींचे वजन जास्त असल्याने बैलगाडी, ट्रॅक्टर, जीप आदी वाहनांच्या सहाय्याने मोटरी काढण्याचे काम गेले दोन दिवस सुरु आहे.

 

Back to top button