पश्चिम घाटात धुवाँधार, हिरण्यकेशीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | पुढारी

पश्चिम घाटात धुवाँधार, हिरण्यकेशीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

गडहिंग्लज – पुढारी वृत्तसेवा : गेले दोन-तीन दिवसांपासून पश्चिम घाटात सुरु असलेल्या धुवाँधार तसेच आजरा, गडहिंग्लज तालुक्यातही संततधार पाऊस कोसळू लागल्याने हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री साडेदहाला आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा सर्वप्रथम पाण्याखाली गेला आहे. अख्ख्या जूनसह जुलैच्या मध्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागलेल्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

यंदा पावसाने सुरुवातीपासून हुलकावणी दिली होती. जूनचा पूर्ण महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. गडहिंग्लज तालुक्यात ठिकठिकाणी पावसाची प्रतीक्षा लागून राहिल्याने पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबून राहिल्या होत्या. पाण्याअभावी माळरानावरील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. तर ठिकठिकाणचे ऊसपीक वाळण्यास सुरुवात झाली होती. जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावल्याने रखडलेल्या पेरण्या उरकण्यास प्रारंभ झाला होता. मात्र, मोठ्या पावसाची प्रतीक्षाच लागून राहिली होती. गेले चार दिवस तालुक्यात पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या.

दोन दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणपट्ट्यात धुवाँधार पाऊस कोसळू लागल्याने हिरण्यकेशी तसेच घटप्रभा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. साळगाव बंधार्‍यावर पाणी आल्याने तेथील वाहतूक सोहाळे मार्गे वळविण्यात आली. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत हिरण्यकेशीवरील आणखी बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

Back to top button