पृथ्वी शॉ म्हणाला, मला एकटं राहायला आवडतं | पुढारी

पृथ्वी शॉ म्हणाला, मला एकटं राहायला आवडतं

मुंबई, वृत्तसंस्था : भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने म्हटले आहे की, ‘लोक माझ्याबद्दल बरेच काही बोलत आहेत. मात्र जे मला ओळखतात, त्यांना मी कसा आहे हे माहिती आहे. माझे फार मित्र नाहीत. मला मित्र बनवायला आवडत नाही. या पिढीत हे असे होत आहे. तुम्ही तुमचे विचार कोणाशीही शेअर करू शकत नाही…’ 22 वर्षीय पृथ्वी म्हणाला, मी कुठेही गेलो तरी वादविवाद माझा पिच्छा सोडत नाही. मला एकट्याला वेळ घालवायला आवडतो. माझे फार मित्र नाहीत.

गेल्या काही महिन्यापासून पृथ्वी शॉ त्याच्या कामगिरीमुळे कमी अन् वादांमुळेच जास्त चर्चेत राहिला होता. मैदानाबाहेरच्या या प्रकरणांमुळे शॉच्या कारकिर्दीवर देखील परिणाम होत आहे. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघातून डच्चू मिळाला आहे. याचबरोबर त्याचा एशियन गेम्स 2023 साठी पाठवण्यात येणार्‍या युवा संघातही स्थान मिळालेले नाही. पृथ्वी शॉने आपली कारकीर्द सावरण्यासाठी एक मोठा निर्णय घेला आहे. त्याने नॉर्थम्पटनशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉला इंग्लंडमध्ये खेळणे आवडते. तो इंग्लंडमध्ये वयाच्या 12 व्या वर्षापासून खेळतोय.

विस्डेन इंडिया आणि क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वी शॉ म्हणाला, मी काऊंटी क्रिकेटकडे फक्त एक सामना म्हणून पाहात आहे. आम्ही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जसा सामना खेळतो तसेच हेही आहे. खूप काही मोठी गोष्ट नाही फक्त एक वेगळा अनुभव. त्यांच्याकडून खेळण्यासाठी आमंत्रण येणे ही खूप मोठी गोष्ट आहे.

शॉ पुढे म्हणाला की, मला तिथे जाऊन त्यांच्यासाठी धावा करायच्या आहेत. त्यांची अपेक्षा तशीच आहे. सहाजिकच त्यांनी माझी कामगिरी पाहिली आहे. त्यामुळेच त्यांनी मला आमंत्रित केले आहे. त्यांना माझ्याकडे काहीतरी क्षमता आहे असा विचार त्यांनी केला असावा. मला वाटते की इंग्लंडमध्ये खेळताना मजा येईल.

पृथ्वी शॉकडे भारताचा तीनही क्रिकेट फॉरमॅटमधील फलंदाज म्हणून पाहिले जात होते. त्याच्याकडून काहीतरी मोठे करण्याची अपेक्षा होती. मात्र मुंबईकर पृथ्वी शॉ आता भारतीय संघात परतण्यासाठी जोर लावत आहे. त्याची बॅटच आता बोलेल अशी आपेक्षा आहे. काऊंटी क्रिकेटमधील दमदार कामगिरी त्याच्यासाठी टीम इंडियाची दारे उघडणार का हे पहावे लागेल.

Back to top button