विरोधकांची मोट बांधणार्‍याचीच बोट फुटली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

विरोधकांची मोट बांधणार्‍याचीच बोट फुटली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. परंतु, विरोधकांची मोट जे बांधत होते, त्यांचीच बोट आता फुटली आहे. मग मोट बांधणार कुठून? असा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध ज्या ज्यावेळी सर्व पक्ष एकवटतात, त्या त्या वेळी त्यांची लोकप्रियता वाढते. 2014 मध्ये विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाले. 2019 ला पुन्हा सर्व विरोधक एकत्र आले; पण विरोधी पक्षनेता निवडण्याइतकेही त्यांचे खासदार विजयी झाले नाहीत. देशभरात फक्त 40 खासदार निवडून आले, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. तसेच आता पुन्हा ही सर्व मंडळी एकत्र आली आहेत. सर्व पक्ष एकत्र येऊनही एक नेता ठरवू शकत नाहीत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय पक्का आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात शिवसेना पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, खा. श्रीकांत शिंदे, आ. प्रकाश आबिटकर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व मान्य झाल्याने अजित पवार सरकारमध्ये विरोधक गेल्या वर्षभरापासून सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी करत आहेत; पण त्यात तथ्य नाही. राजकारणात काही बेरजेची समीकरणे करावी लागतात. आता तर सरकारला 220 आमदारांचे पाठबळ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य झाले. राज्य सरकारचे काम चांगले चालले असल्याने राज्याच्या विकासासाठी त्यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. परंतु, शिवसेना-भाजप यांची युती वैचारिक आहे. डबल इंजिनच्या सरकारने विकासकामांचा वेग वाढवला. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरून पायाखालची वाळू सरकली आहे. पुढील दीड वर्षात हे आणखी किती विकासकामे करतील, ही भीती त्यांना आहे. म्हणूनच ते वज्रमूठ सभा घेत आहेत; पण शिवसैनिकांनी चिंता करू नये, शिवसेना-भाजपची युती वैचारिक आणि मजबूत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्राला केंद्र सरकारचे पाठबळ…
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार राज्याला आर्थिक पाठबळ देण्याचे काम करत आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यापूर्वीचे सरकार केंद्राकडे काहीही मागायला जात नव्हते. अहंकार, इगो कशाला पाहिजे? त्यामुळे काही मिळत नव्हते. राज्यातील जनतेसाठी मागायला काय हरकत आहे? आमच्या सरकारने केंद्राकडे अनेक प्रस्ताव सादर केले. त्यातील एकही प्रस्ताव नाकारला नाही. सर्व प्रस्ताव मंजूर होऊन निधी मिळत आहे.
2017 मध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी जाणार होता
2014 मध्ये युती नव्हती; पण निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपचे सरकार करण्यासाठी पुढाकार घेतला; पण शिवसेना नेतृत्वाने मान्य केले नाही. विरोधी पक्षनेतेपद घेतले. 2017 मध्ये राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे नकार दिला. शिवसेना या वैचारिक युती असलेल्या मित्राशिवाय सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
निष्ठा आम्ही बाळगली, बक्षीस दुसर्‍याला : क्षीरसागर
कोल्हापूर शहराच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणला. पण मी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाचे बक्षीस दुसर्‍याला दिले. ज्या व्यक्तीने कधीही शिवसेनेचे काम केले नाही. कधीही धनुष्यबाणाला मतदान केले नाही, त्याला राज्यसभेची उमेदवारी दिली. पण गद्दारी केली म्हणून त्याचा पराभव झाला, अशा शब्दांत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी संजय पवार यांचे नाव न घेता टीका केली.
क्षीरसागर म्हणाले, कोल्हापुरात शिवसेनेची स्थापना झाल्यापासून कट्टर शिवसैनिक म्हणून काम करत आहे. 37 वर्षे अखंडपणे शिवसेनेत काम करत आहे. दोनवेळा आमदार झालो. या काळात  आमचे  दुर्देैव होते की सहा आमदार असूनही कोल्हापूरच्या आमदारला मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही. जर तेव्हा मंत्रिपद मिळाले असते तर जिल्ह्यात सहाचे दहा आमदार केले असते.
2024 ची निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढणार :  केसरकर
2024 च्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जाणार असल्याचे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
गड-किल्ले संवर्धनासाठी परवानगी घेण्याचे काम सुरू आहे. पावनखिंड पदभ्रमंती करताना विश्रांतीसाठी  मुक्कामस्थळ उभारण्यासाठी 70 लाख मंजूर करण्यात आले आहेत. शिवाजी पूल व पंचगंगा घाटासाठी निधी मंजूर करावा, विमानतळ धावपट्टी वाढवल्यानंतर जे रस्ते बंद झाले, त्यासाठी 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्याला मंजुरी मिळावी, अशी मागणी केली.
मेळाव्याला जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने, राजेखान जमादार, आनंदराव जाधव, ऋतुराज क्षीरसागर, माजी महापौर नंदकुमार वळंजू, नंदकुमार मोरे, रवी रजपूते,  शिवाजीराव जाधव, मंगल साळोखे, तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस निष्कलंक माणूस…
शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच दोन पावले मागे जाऊन अनुकूल भूमिका घेतली. 2019 मध्ये युती स्थापन करण्यासाठी फडणवीस यांनी सुमारे 50 वेळा उद्धव ठाकरे यांना फोन केले. परंतु, त्यांनी फोन उचलला नाही. 2019 ला निकालाचे आकडे समोर आल्यानंतर ठाकरे यांनी आमच्यासमोर सर्व दरवाजे उघडे आहेत, असे सांगितले. त्यामुळे कृतघ्न असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी युती धर्म पाळला. फडणवीस हा निष्कलंक माणूस आहे. उद्धव ठाकरे हेच कलंकित आहेत. 2019 ला युती न करून तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना कलंकित केले. ठाकरे यांनीच झूटनीतीचा अवलंब केला, असा आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी कधी तडजोड केली नाही आणि करणारही नाही, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
* कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रश्न सोडवणार
* महापालिकेतील रिक्त पदे भरू
* इचलकरंजी रेल्वे मार्गासाठी निधी देऊ
* आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाहू स्मारकासाठी निधी
* पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी निधी देऊ

Back to top button