कोणत्याही रेशन दुकानांत मिळणार धान्य | पुढारी

कोणत्याही रेशन दुकानांत मिळणार धान्य

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  देशभरातील कोणत्याही रेशन धान्य दुकानात कार्डधारकाला धान्य मिळणार आहे. केंद्र शासानाने ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. याकरिता राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्र शासनाने 2018 मध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेची सुरुवात केली. राज्यात या योजनेची अद्याप प्रभावी अंमलबजावणी सुरू नव्हती. ती आता केली जाणार आहे. याकरिता अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक जिल्ह्यात कार्यवाही केली जाणार आहे.

या योजनेसाठी ही असेल पात्रता

रेशनकार्डचा बारा अंकी क्रमांक आवश्यक आहे. कार्डधारकांचे अथवा अन्य कोणाचेही दुसर्‍या कार्डमध्ये नाव नसावे. कार्डावर नाव असलेल्यांपैकी एकाचे आधारसिडिंग आवश्यक. ई-पॉस मशिन उपलब्ध असलेल्या दुकानांतून यापूर्वी वितरण आवश्यक.

लाभार्थ्यांसाठी ‘मेरा राशन’ अ‍ॅप

या योजनेतील लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाने ‘मेरा राशन’ हे अ‍ॅप विकसित केले आहे. याद्वारे धान्य किती मिळते, जवळचे धान्य दुकान आदींसह शिधापत्रिकेची सर्व माहिती मिळणार आहे. या अ‍ॅपबाबत जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेशही पुरवठा विभागाला दिले आहेत.

धान्य मोफत; आणण्यासाठी खर्च

राज्यात सध्या मोफत धान्य दिले जाते. धान्य मोफत मिळत असले तरी आणण्यासाठी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी ये-जा करण्यात मोठा खर्च होत असतो. यामुळे अनेकांनी हे धान्यही नाकारल्याचे प्रकार समोर येत आहेत. पार्श्वभूमीवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

योजनेचा यांना होणार फायदा

नोकरी, व्यवसाय, कामधंद्यानिमित्त तसेच अन्य काही कारणास्तव मूळ वास्तव्य ठिकाणापासून दूर असलेल्या सर्व कार्डधारकांना याचा फायदा होणार आहे. याखेरीज स्थलांतरित, ऊसतोड कामगार, आदिवासी आदींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Back to top button