कोल्हापूर : राजापूर बंधाऱ्यातून कृष्णेचे कर्नाटकाला पाणी, २ हजार क्यूसेकने विसर्ग | पुढारी

कोल्हापूर : राजापूर बंधाऱ्यातून कृष्णेचे कर्नाटकाला पाणी, २ हजार क्यूसेकने विसर्ग

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा – पाणलोट व धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी १८ फूट एक इंच झाली आहे. तर कृष्णा नदीची पाणीपातळी साडेअकरा फूट इतकी आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर शिरोळ बंधाराही आज दुपारपर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. राजापूर बंधारातून कर्नाटक राज्याला ९ हजार, २०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कृष्णा पंचगंगा नदीची खालावलेल्या पाणी पातळीत वाढ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान कृष्णा नदीतून नृसिंहवाडी संगमापर्यंत ११०० क्युसेक पाण्याची आवक आहे. तर पंचगंगा नदीतून ८ हजार १०० क्युसेक इतक्या पाण्याची सर्वाधिक आवक सुरू आहे. राजापूर बंधाऱ्यातून पंचगंगा नदीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

पावसाने सध्या रिपरिप सुरू ठेवल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीय. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन तेरवाड बंधारा पाण्याखाली गेला असून ८ इंचाने बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे. तेरवाड बंधारा ते शिरढोण पुलापर्यंतची जलपर्णी प्रवाहित पाण्याने वाहून गेली आहे. तर तेरवाड बंधाऱ्याजवळ हेरवाड पानवट्यापर्यंत जलपर्णी तुंबून राहिली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्यानंतरच ही जलपर्णी प्रवाहित होणार आहे.

कृष्णा-वारणा नदीतून अंकली पुलाखालून राजापूर बंधाऱ्याकडे ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यातून ८ हजार १०० क्यूसेकने पंचगंगा नदीच्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कृष्णा व पंचगंगा या दोन्ही नदीतून ९ हजार २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटक राज्याकडे होत आहे.

कृष्णा-पंचगंगा नदीक्षेत्रात १५ दिवसांपूर्वी जलाशयाच्या कोठ्यात कमालीची घट झाली होती. त्यामुळे औरवाडचा जुना पूल दिसत होता. गौरवाड पाणवठा पूर्ण खुला झाला होता. तर राजापूर बंधारा परिसर खुला झाला होता. शेतीपंप उघडे पडल्याने नदीत चर मारून पाणी उपसा करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली होती. पाणलोट क्षेत्र व शहर परिसरात पावसाने सुरुवात केल्याने शिरढोण कुरुंदवाड हद्दीतील नदीकाठावरील मळी शेतीतील गवते कापणीला वेग आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीपंपाच्या मोटारी पात्राबाहेर काढल्या आहेत. पंचगंगा आणि कृष्णा नदीला पाणी आल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

तेरवाड बंधारा हा शिरोळ तालुक्यातील शेतीसाठी वरदान आहे. सध्या या बंधार्‍याला जलपर्णीचा दाब बसत आहे. त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. अनेक महापुराचा सामना केलेल्या या बंधार्‍याची दुरावस्था झाली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या बंधाऱ्याबाबत पावसाळ्यानंतर ठोस पावले उचलत मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून देऊन हा बंधारा दुरुस्त करावा आणि शेतकऱ्यांना वरदान असणारा हा बंधारा सुस्थितीत करावा. – शेतकरी रियाज कोठीवाले

Back to top button