कागलमध्ये आतापासूनच खडाखडी सुरू

कागलमध्ये आतापासूनच खडाखडी सुरू
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्याने या तीन पक्षांना अनेक मतदारसंघांत अंतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागणार आहे. त्याची सुरुवात कागल मतदारसंघातून झाली आहे. कागलमध्ये आतापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांची खडाखडी सुरू झाली आहे. यामुळे मुश्रीफ-घाटगे यांचे मनोमीलन तर दूरच; पण त्यांच्यातील संघर्ष कायम राहील, अशीच शक्यता अधिक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर अनेकांची राजकीय कोंडी झाली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून मुश्रीफ यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवलेल्या घाटगे यांची अवस्था वेगळी नाही. घाटगे यांनी गेल्या काही वर्षांपासून मुश्रीफ यांच्याविरोधातील आपली लढाई नेटाने चालू ठेवली आहे. संधी मिळेल तिथे मुश्रीफ यांना घेरण्याचा प्रयत्न घाटगे यांनी केला. त्याला पक्षीय साथही मिळाली.

एकीकडे मुश्रीफ यांच्या विरोधातील संघर्ष तीव- केला असताना त्यांनाच मंत्रिपद मिळाल्याने, घाटगे यांची अस्वस्थता वाढणे स्वाभाविक आहे. चार दिवस घाटगे यांनी धारण केलेले मौन हे त्याचेच दर्शक होते. मुश्रीफ यांचा सत्तेत सहभाग हा घाटगे यांच्या प्रयत्नाला आणि पर्यायाने पक्षाच्या वाढीलाही कुठे तरी खीळ बसण्यासाठी धोका ठरू शकतो. यामुळेच घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या समवेत मनोमिलनाऐवजी संघर्षाची भूमिका काय राहील, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मौन सोडताच घाटगे यांनी कागलमध्येच शक्तिप्रदर्शन करत मुश्रीफ यांच्यावर हल्ला चढवला. 2024 ची विधानसभा आपण लढवणार आणि जिंकणारच, असा निर्धार करत कागलमध्ये परिवर्तन होणार, त्या विजयाची पायाभरणी केल्याचे मेळाव्यात सांगत त्यांनी मुश्रीफ यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. येत्या काही दिवसांत मतदारसंघात दौरा सुरू करणार असल्याचेही जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री म्हणून मुश्रीफ यांचा दीर्घ अनुभव आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना, त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू झाला. त्याला आपण धाडसाने तोंड दिल्याचे सांगत आपण कोणाला अडचणीत आणले नाही. मात्र आपणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यावर मात करून पुढेच जाणार, असा निर्धार करत असल्याचे सांगत त्यांनी घाटगे यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी उपस्थितांनी मुश्रीफ यांना कागलमधूनच विजयी करण्याचा निर्धार केला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीला अजूनही दीड वर्षाचा कालावधी असला तरी आतापासूनच कागलमध्ये सुरू झालेल्या खडाखडीने कागलमधील संघर्ष आगामी काळात चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.

मतदारसंघात पक्षीय संघर्ष अटळ

मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील कागलचा संघर्ष संपूर्ण राज्याला माहीत आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतरही या दोघांतील संघर्ष वाढण्याचीच नव्हे तर टोकाला आणि वैयक्तिक पातळीवरही जाण्याचीही शक्यता आहे. तसेच काहीसे संकेत घाटगे आणि मुश्रीफ यांनी आपापली भूमिका मांडताना दिले आहेत. सत्तेसाठी जरी भाजप-राष्ट्रवादी एकत्र आली असली तरी मतदारसंघात दोघेही एकमेकांमागे राहतील, याची शक्यता फारच कमी आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या स्वागताकडे भाजपने जवळपास पूर्णपणे पाठ फिरवली. त्यातून मंत्री म्हणून काम करताना कागल मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजप असा पक्षीय संघर्षही निर्माण होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news