पक्षात डावलले की वेदना होतात : रूपाली चाकणकर | पुढारी

पक्षात डावलले की वेदना होतात : रूपाली चाकणकर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महिला आयोगाची अध्यक्षा झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा घेतला, त्यावेळी प्रचंड वेदना झाल्या. पंधरा महिने राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय व्यासपीठावर आपल्याला बोलवले नाही. डावलले की वेदना होतात, त्याची सल होती. कार्यकर्ता म्हणून मलाही अधिकार होता. यामुळेच अजित पवार यांच्या गटात गेल्याचे सांगत राष्ट्रवादीत महिलांची संख्या वाढण्याऐवजी कमी का होत होती, असा सवालही राष्ट्रवादी  काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारमध्येही आपण अन्य पक्षाच्या व्यासपीठावर जात नव्हतो. आताही शिवसेना, भाजपच्या व्यासपीठावर जाण्याचा प्रश्न नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. कार्यकाल संपेपर्यंत महिला आयोगाची अध्यक्ष मीच असेल, असे सांगत चाकणकर यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांच्याशी भविष्यातही संघर्ष राहील, असे संकेत दिले.

आम्ही पक्ष बदललेला नाही, आम्ही विचारधाराही बदलेली नाही. पण गेली 18-19 वर्षे घरावर तुळशीपत्र ठेवून संघटनेचे काम केले. रस्त्यावर उतरून, 12 गुन्हे अंगावर घेऊन ऐन उभारीचा काळ संघटनेसाठी दिला, त्याच पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. त्यावेळी प्रचंड वेदना झाल्या. आयोगाचे अध्यक्षपद आणि प्रदेशाध्यक्षपद असते तर संघटनेलाच फायदा झाला असता. यापूर्वीही ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, त्या पदावर होत्या. आपल्याबाबतच हा निर्णय का घेतला? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या वाढायला हवी होती, ती कमी का होत गेली, असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्ष खा. सुळे यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्याबाबत विचारता, ते एकत्र आल्यानंतर त्यावर चर्चा करू. प्रथम त्यांना तरी चर्चा करूद्या, असे सांगत 2024 च्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा टक्का वाढेल. त्यात महिलांचाही सहभाग अधिक असेल, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button