कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे घोडे अडले कुठे? | पुढारी

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे घोडे अडले कुठे?

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला मंजुरी मिळून तब्बल सव्वासात वर्षे उलटली. मात्र, अद्याप या मार्गाचे काम सुरू झालेले नाही. या मार्गाचे नेमके घोडे कुठे अडलेय, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 3 हजार 224 कोटी रुपये खर्चाच्या कोल्हापूर-वैभववाडी या 108 कि.मी. लांबीच्या मार्गाची 25 फेब—ुवारी 2016 रोजी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा केली. हा प्रकल्प रेल्वे आणि राज्य शासन, असे मिळून पूर्ण करणार असल्याने या मार्गाला मंजुरी देतानाच रेल्वेकडून 1,300 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. त्याचे टोकन म्हणून एक लाख रुपयांची तरतूदही त्यावेळी केली होती.

तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गासाठी निधी कमी पडू देणार नाही, हा मार्ग तडीस नेला जाईल, अशी घोषणा केली होती. दि. 18 डिसेंबर 2016 रोजी मुंबईत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेल्वेबाबत झालेल्या सामंजस्य करारात कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचाही समावेश करण्यात आला होता.

फेब—ुवारी 2017 च्या अर्थसंकल्पानंतर रेल्वेने जाहीर केलेल्या पिंक बुकमध्ये या मार्गासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 7 मे 2017 रोजी या मार्गाचा डीपीआर रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला होता. यानंतर 11 जून 2017 रोजी रेल्वेमंत्री प्रभू यांच्याच उपस्थितीत कराड येथे या मार्गाच्या अंतिम सर्वेक्षण कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. सध्या या मार्गाच्या 25 किलोमीटरचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, हे सर्वेक्षण होणार कधी, त्याला मंजुरी कधी मिळणार आणि या मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू कधी होणार, या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरितच आहेत.

अन्य मार्गांना गती; कोल्हापूर-वैभववाडी मात्र साईड ट्रॅकवर

राज्य शासनाने राज्यातील अन्य रेल्वेमार्गांना गती दिली आहे. दरवर्षी विविध मार्गांना निधी दिला जात आहे. दि. 28 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जालना-जळगाव या नवीन ब—ॉडगेज रेल्वेमार्गासाठी 3,552 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारत असताना कोल्हापूर-वैभववाडी मार्ग मात्र साईड ट्रॅकवरच ठेवला आहे.

कोकण रेल्वेच्या मुख्य सल्लागार समितीची आज बैठक

कोकण रेल्वेच्या मुख्य सल्लागार समितीची 19 वी बैठक बुधवारी गोव्यात होणार आहे. या बैठकीला खासदार धनंजय महाडिक आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी सदस्य म्हणून उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत खा. महाडिक व गांधी यांनी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचा प्रश्न उपस्थित केला आहे. कोकण रेल्वेने त्याचा बैठकीच्या अजेंड्यात समावेश केला आहे. यामुळे या बैठकीत कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाबाबत चर्चा होणार आहे. त्यातून या मार्गाची सद्यस्थिती समजण्याची शक्यता आहे.

Back to top button