कोल्हापूर : कागलचे राजकीय त्रांगडे; एका म्यानात तीन तलवारी राहणार का ?

कोल्हापूर : कागलचे राजकीय त्रांगडे; एका म्यानात तीन तलवारी राहणार का ?
Published on
Updated on

बिद्री, टी. एम. सरदेसाई : कागल हे कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ समजले जाते. राजकारणातील खुन्नस ही येथील पारंपारिकता आहे. त्याचा प्रत्यय १९७८ पासून तत्कालीन आमदार विक्रमसिंह घाटगे व आमदार, मंत्री सदाशिवराव मंडलिक यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता. घाटगे-मंडलिक यांचे राजकीय द्वंद व ईर्षा सार्‍या जिल्ह्याने पाहिली आहे. राजकारणातून गटातटातील मारामार्‍या व खुनापर्यंत ही मजल गेली होती. साक्षी देण्यासाठी ट्रॉलीला ट्रॉली जोडून भरून लोक येत-जात होते. काळाच्या ओघात अनेक स्थितंतरे झाली. पण तिच राजकीय ईर्षा आता ही कायम आहे.

राज्यातील नव्या राजकीय समीकरणात भाजप – शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी कागल तालुक्यात मोठी राजकीय ताकद निर्माण झाली आहे. तिन्ही गटाचे तीन मातब्बर नेते आहेत. त्यांची राजकीय महत्वकांक्षा पाहता ते नेते एकत्र येतील का? कोण कुणाशी जमवून घेणार? यातून कागलच्या राजकारणाचे त्रांगडे झाल्याचे दिसते. एका म्यानात तीन तलवारी राहणार का? हा प्रश्न चर्चिला जात असून कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे.

रविवारी राज्यातील राजकारणातील मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व अनेक आमदार शिंदे-फडणीस सरकारमध्ये सहभागी झाले. काल पर्यंत एकमेकांवर चिखलफेक करणारे गळ्यात गळे घालत हसतमुख चेहरे पाहून सोशल मीडीयावर प्रचंड मतमतांतरे होत आहेत. राज्यकर्त्यांना ट्रोल करण्यात आल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. पण राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो. हे पहावयास मिळाले आहे. जनता मात्र सर्व काही अवाक होऊन पहात होती. या नव्या राजकीय समीकरणात मात्र कागलचे राजकीय त्रांगडे झाले आहे. तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे असे प्रमुख चार राजकीय गट आहेत. प्रत्येकांनी आपले राजकीय अस्तित्व जपत कार्यकर्ते व समर्थकांची फौज जपली आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतपासून ते खासदारकी पर्यंतच्या सर्व निवडणूका मोठ्या अटीतट्टीने लढविल्या जातात.

मुश्रीफ -घाटगे दोन्ही राजकीय टोके अत्यंत तीक्ष्ण झाली आहेत. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांचा पराभव केल्यानंतर घाटगे हे पराभवाच्या दिवसापासून सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत माझाच विजय असणार आहे, असे जाहिर करून मतदार संघ पिंजून काढत आहेत. सभा, मेळाव्यातून मुश्रीफांवर बोलण्याची संधी सोडली नाही. तर मुश्रीफांनी ही तोडीस तोड देत विकासकामे व त्यांची उध्दाटने घेत आरोप-प्रत्यारोप केले होते. यातून अलिकडच्या काळात तर ईर्षेने शिखर बिंदू गाठला होता. ईडी आणि धाडी यांच्यामागे घाटगे आहेत, असा ही आरोप केला होता. रविवारच्या राजकीय भूकंपात भाजप-शिंदे शिवसेनेच्या गोटात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर आमदार हसन मुश्रीफ यांनी समर्थन देत कॅबिनेट मंत्रीपद ही मिळविले. यामुळे मुश्रीफ समर्थकांत उत्साह पसरला होता. मात्र, भाजपचे कार्यकर्ते मात्र शांतपणे बसून होते. समरजितसिंह घाटगे काय भूमिका घेणार याकडे लक्ष ठेवून होते. पण दोन दिवस त्यांचाकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. त्यामुळे भाजप समर्थकांत यामध्ये अधिकच चलबिचलता झाली आहे.

आमदार मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी एकमेकांविरुद्ध सहावेळा विधानसभा निवडणूक लढविली. यामध्ये मुश्रीफांचा एकवेळ पराभव झाला. यानंतर एकमेकांना साथ देण्याची कबुली देत गेली वर्षभर राजकीय मैत्री घट्ट केली आहे. सार्वजनीक कार्यक्रमांत ठिकठिकाणी एका हारात गुंफून घेतले आहे. मात्र मुश्रीफांनी राजकीय पटलचं बदलल्यामुळे संजयबाबा घाटगे निशब्द झाले आहेत. संजयबाबा घाटगे हे उध्दव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. ठाकरे शिवसेना व शिवसेना यांच्यातील राजकीय वाद यामुळे घाटगे हे मुश्रीफांना साथ देणार की ठाकरे गटाचे समर्थन करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

खासदार संजय मंडलिक हे 'मविआ' तून जरी निवडून आले असले तरी यापूर्वीच्या पहिल्या राजकीय भूकंपात मुख्यमंत्री शिंदे गटाकडे राहिले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला त्यांची लाईन क्लिअर आहे. त्यांचा ही तालुक्यात साखर कारखाना व कार्यकर्त्यांची फौज असल्यामुळे चांगला गट आहे. जिल्ह्यातील महाडिक गटाची ताकद युतीधर्म म्हणून मिळणार आहे. त्यामुळे पुढील लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यामुळे भाजप – शिंदे गट व राष्ट्रवादी कॉंग्रेस गट अशी कागल तालुक्यात मोठी राजकीय ताकद निर्माण झाली आहे. पण तिन्ही गटाचे तीन मातब्बर नेते आहेत. त्यांची राजकीय महत्वकांक्षा पाहता ते नेते एकत्र येतील का ? कोण कुणाशी जमवून घेणार व एका म्यानात तीन तलवारी राहणार का ? हा प्रश्न चर्चिला जात आहे. राजकीय त्रांगडे कसे भेदणार हा येता काळच ठरवणार आहे.

जिल्ह्यात 'भाजप' ला सामावून घेणार का ?

जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडी म्हणून राष्टूवादी, काँग्रेस व ठाकरे गट एकत्र येत जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती निवडणूका आ. हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली लढविल्या होत्या. यातून 'भाजप' ला बाजूलाच ठेवले होते. नव्या राजकीय समिकरणात आगामी बिद्री, भोगावती तसेच अन्य संस्थांच्या निवडणूकीत व जिल्ह्यातील सत्ता स्थानात 'भाजप ' ला सामावून घेणार का ? जिल्ह्यात ट्रिपल इंजिन धावणार का. याची ही चर्चा होत आहे.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news