राष्ट्रवादीच्या दोन्ही बालेकिल्ल्यांना हादरे | पुढारी

राष्ट्रवादीच्या दोन्ही बालेकिल्ल्यांना हादरे

गडहिंग्लज, प्रवीण आजगेकर : कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघांपैकी कागल व चंदगड हे दोनच मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघ तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यापूर्वी राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या; मात्र त्यावेळीही हे बालेकिल्ले मजबूत राहिले. रविवारी राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार हे आमदारांच्या पाठिंब्यासह शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत कागल मतदारसंघाचे आ. हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली, तर चंदगडचे आ. राजेश पाटील हेही सोबत गेल्याने दोन्ही मतदारसंघांतील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना हादरे बसल्याचे दिसून येते.

आ. हसन मुश्रीफ यांनी गेले पंधरा दिवस मतदारसंघात शासन आपल्या दारी अभियान जोरात राबवित मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो बॅनरवर लावून आपली दिशा स्पष्ट केली. आ. राजेश पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात आपले मेहुणे व शिंदे गटाचे खा. संजय मंडलिक यांच्या साथीने कोट्यवधीचा निधी आणला आहे; मात्र आपण शिंदे गटासोबत जाणार नसल्याचा खुलासा त्यांनी वेळोवेळी केला होता.

रविवारी मात्र थेट अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आपल्यासोबत घेतलेल्या आमदारांमध्ये आ. राजेश पाटील हेही असल्याने ते शिंदे गटासोबत गेले नसले, तरी अजित पवारांसोबत सरकारमध्ये गेल्याचे दिसून येते.

चंदगड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, आ. पाटील हे अजित पवारांसोबत गेले असले, तरी तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. अशीच काहीशी परिस्थिती कागल मतदारसंघातही झाली असून, कार्यकर्ते नेमके काय करणार, हे पाहावे लागणार आहे. दोन्ही आमदार सरकारमध्ये दाखल झाल्याने काही कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला असला, तरी शरद पवारांना मानणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये मात्र चलबिचल वाढली आहे. यामुळे नेमके काय होणार, हे आगामी काळात समजेल.

पहिल्या फळीतील नेते गोंधळात

कागल व चंदगड हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असून शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. आ. मुश्रीफ व आ. पाटील यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने जुन्या व पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांना संभ्रमात पडण्याची वेळ आली असून, नेमके शरद पवारांसोबत राहायचे की मतदार संघाचे नेतृत्व करणार्‍या आमदारांसोबत राहायचे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

Back to top button