कोल्हापूर जिल्ह्यात संततधार | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात संततधार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शनिवारी पावसाची संततधार होती. शहर आणि परिसरात विश्रांती घेत पाऊस सुरू होता. जिल्ह्याच्या पश्चिम भागात, विशेषत: धरण क्षेत्रात पावसाचा जोर होता. रविवारपासून चार दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्याच्या अनेक भागांत दमदार पावसाने हजेरी लावली. शहर परिसरात थांबून थांबून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातही बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला. शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड तालुक्यांतील अनेक भागांत पावसाची संततधार होती.

पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ सुरू झाली आहे. पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात अर्धा फुटाने वाढ झाली. सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी 10.8 फुटांवर होती. सायंकाळी चार वाजता ती 11.2 फुटांवर गेली. जिल्ह्यात पुढील चार दिवस दमदार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 12.1 मि.मी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 61.1 मि.मी. इतका झाला. गगनबावडा परिसरात अतिवृष्टी झाली. तिथे 76 मि.मी. पावसाची नोंद झाली. पन्हाळा तालुक्यात 19.9 मि.मी., राधानगरी 14 मि.मी., भुदरगड 14.8 मि.मी., आजर्‍यात 14.1 मि.मी., चंदगड 13.1 मि.मी., करवीर 12.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरात 17 मि.मी. पावसाची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला. कोदे, कुंभी, कासारी व पाटगाव या चार धरणांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. कोदेत 91 मि.मी., कुंभीत 86, पाटगावमध्ये 85 तर कासारी परिसरात 82 मि.मी. पाऊस झाला. राधानगरी धरण परिसरात 39 मि.मी., तुळशी परिसरात 51 मि.मी., कडवीत 46 मि.मी., घटप्रभा परिसरात 47 मि.मी. पाऊस झाला.

Back to top button