कोल्हापूर : पावसाचा जोर वाढला; गगनबावड्यासह दोन धरण क्षेत्रात अतिवृष्टी | पुढारी

कोल्हापूर : पावसाचा जोर वाढला; गगनबावड्यासह दोन धरण क्षेत्रात अतिवृष्टी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर वाढला. शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत दुपारनंतर दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू होती. धरण क्षेत्रांतही पाऊस सुरू आहे. पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरू असून पंचगंगा पातळी दहा फुटांवर गेली. जिल्ह्याच्या अनेक भागांत आज दमदार पाऊस झाला. दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने नद्या-नाल्यांची पातळी वाढू लागली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 16 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा परिसरात अतिवृष्टी झाली. तिथे 89 मि. मी. पाऊस झाला. संपूर्ण गगनबावडा तालुक्यात 64 मि.मी. पावसाची नोंद झाली.

पाटगाव धरण परिसरात अतिवृष्टी झाली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासांत 113 मि.मी. पावसाची नोंद झाली. कुंभी धरण परिसरात 95 मि.मी. पाऊस झाला. कोदे परिसरात 63 मि.मी., कासारी परिसरात 51 मि.मी., तर राधानगरी व तुळशी परिसरात प्रत्येकी 39 मि.मी. पाऊस झाला. पावसाने शहरातील जयंती नाला दुथडी भरून वाहू लागला आहे. गेल्या काही दिवसांनंतर प्रथमच नाला ओव्हरफ्लो झाला. नाल्यातून फेसाळलेले पाणी पंचगंगेत मिसळत होते. महावीर महाविद्यालय-कसबा बावडा मार्गावर मेरी वेदर मैदानानजीक शाळेतील झाड रस्त्यावर पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. यावेळी रस्त्यावरून जाणारी एक महिला सुदैवाने बचावली.

Back to top button