विशाळगड, पुढारी वृत्तसेवा : किल्ले विशाळगड येथील पायथ्यालगतच्या दरीवरील लोखंडी शिडीनजीकचा दगडी बुरूज अतिवृष्टीमुळे गत जुलै महिन्यात ढासळला होता. या घटनेला तब्बल 11 महिने उलटले तरी डागडुजी न झाल्याने पुन्हा सोमवारी रात्री बुरूज ढासळला. बुरुजाचे एक-एक दगड खाली कोसळू लागले आहेत.
विशाळगडावर दोन मार्गाने जाता येते. एक मार्ग लोखंडी शिडीचा, तर दुसरा शिवकालीन पायरी मार्ग आहे. शिडी मार्गानेच पर्यटक जातात. लोखंडी शिडीपासून अवघ्या 20 फुटांवरील हा बुरूज सोमवारी रात्री पुन्हा ढासळला. एक-एक दगड दरीत मार्गावरून कोसळत असल्याने मार्ग धोकादायक बनला आहे. स्थानिकांनी मार्गावरील दगड हटवून रहदारी सुरू केली आहे. ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून लोखंडी जिन्यावरील वाहतूक आता पूर्णतः बंद करण्याची आवश्यकता आहे.
राज्य शासनाने गड, किल्लेसंवर्धन मोहिमेंतर्गत विशाळगडासाठी 4 कोटी 95 लाखांचा निधी मंजूर केला होता. या निधीमधून गडाच्या भिंती, बुरूज, दरवाजे, पाण्याचे साठे, मंदिरांची डागडुजी, पडकी कमान, शिवकालीन विहिरी आदी कामे केली जाणार होती. बुरूज, तटबंदीतील झाडेझुडपे, गवत काढून तसेच जमिनीखाली गाडलेले दगड उत्खनन करून पूर्वेकडील चार बुरुजांची डागडुजी करण्यात आली. मात्र, कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने बुरूज ढासळू लागले आहेत.