कोल्हापूर, राजेंद्र जोशी : शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी, 200 कोटींच्या नव्या योजना आणि 500 कोटी रुपयांच्या निधीचे गाजर, असा प्रलोभनांचा पाऊस झेलणार्या कोल्हापूरकरांना यंदाही पावसाळ्यात खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार आहे. यामुळे कोल्हापूरकरांना आपल्या शरीराचे मणके जपून ठेवावे लागतील.
कोल्हापुरात प्रतिवर्षी पावसाळा आला की, रस्त्यांच्या खड्ड्यांची भयावहता अधिक स्पष्ट होते. एरव्ही कोल्हापूरकर खड्ड्यांतूनच प्रवास करत असतात; पण पावसाळ्यात खड्डे पाण्याने भरले की, त्यांना चुकविताही येत नाहीत आणि चुकविता चुकविता मणके केव्हा सरकले, याची जाणीवही होत नाही. याचा परिणाम म्हणून कोल्हापुरात अस्थिरोगतज्ज्ञांच्या रुग्णालयांमध्ये दाखल होणार्या, फिजिओथेरपी सेंटरमध्ये उपचार घेणार्या रुग्णांची संख्या लक्षणीय झाली आहे. यामुळे आता लोकप्रतिनिधींच्या गाजराच्या टोपलीवर विसंबून न राहता कोल्हापूरकरांना स्वतःची कंबर सांभाळतच प्रवास करावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांना तर अधिक काळजी घ्यावी लागेल.
कोल्हापूर शहराच्या थेट पाईपलाईन योजनेचा विषय तसा 1985 च्या सुमारास सुरू झाला होता. हा विषय आणखी दोन वर्षांत वयाची चाळिशी गाठेल. तसाच शहराच्या रस्त्यांचाही प्रश्न कमी-अधिक प्रमाणात चाळिशी गाठूनही पुढे गेला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक सभेच्या कार्यकाळात खराब रस्त्यांच्या प्रश्नावर कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले होते. महापालिकेला रिक्षाचालकांनी घेराव घातला होता. या प्रश्नावर गेल्या 40 वर्षांच्या काळात काही गुणात्मक फरक झालेला दिसला नाही. दरवर्षी रस्त्यांच्या कामावर 20-25 कोटी रुपये खर्ची पडतात. कधी आमदार फंडातून, कधी खासदार फंडातून, कधी शासनाच्या विशेष निधीतून, तर कधी नगरसेवकांच्या ऐच्छिक बजेटमधून रस्त्यांवर पैसे खर्च होतात. रस्त्यांवरील डांबर पुरेसे सेट होण्यापूर्वीच खोदाई सुरू होते. एक पावसाळा झाला की, रस्ते वाहून जातात आणि पुन्हा कोल्हापूरकरांचा खड्ड्यांतील प्रवास सुरू होतो.
कोल्हापूरकरांच्या या दीर्घकाळच्या दुखण्यावर इलाज शोधण्याऐवजी आता रस्त्यांची दुरुस्ती हा राजकारणाचा मुद्दा बनला आहे. सर्वसामान्यांच्या करातूनच उभारलेल्या निधीमधून रस्ते करताना त्याच्या भूमिपूजनासाठी मोठमोठे शामियाने उभारून नारळ फोडण्याच्या उत्सवाची परंपरा अलीकडे सुरू झाली आहे; पण हे रस्ते का टिकत नाहीत, त्यांच्यासाठी कोणते नवे तंत्र अवगत करणे आवश्यक आहे, त्यासाठी आयआयटीसारख्या संस्थांची मदत घेता येऊ शकते का, यावर विचार होत नाही. उलट कंत्राटदार कोणाचा, यावर अधिक विचार होत असेल; तर आता कोल्हापूरकरांनी या गाजराच्या टोपल्या भिरकावून देण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोल्हापुरात गेल्या पाच वर्षांत कोणत्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले? त्या रस्त्यांची आजची अवस्था काय आहे? शहरात विशेषतः गावठाण भागामध्ये मुख्य रस्त्यांना जोडणार्या किती रस्त्यांवर डांबर पडले? त्यांचीही अवस्था काय आहे? याचाही लेखाजोखा मांडला पाहिजे. कारण, खराब रस्त्यांचा प्रश्न आता सहनशक्तीपलीकडे गेला आहे. तालमींचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्या कोल्हापुरात आता अस्थिरोगाचे रुग्ण लक्षणीय असतील. त्यातही तरुणाईभोवती त्याचा विळखा अधिक घट्ट होत असेल, तर विचार करण्याची हीच वेळ आहे; अन्यथा उद्या कोणाला खराब रस्त्यांमुळे अपघातात जीव गमवावा लागला, तरीही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.