कोल्हापूर : जिल्हा बँक आणि विधान परिषद कनेक्शन! | पुढारी

कोल्हापूर : जिल्हा बँक आणि विधान परिषद कनेक्शन!

कोल्हापूर : संतोष पाटील

जिल्हा बँक निवडणूक वेळेवर होणार की लांबणीवर पडणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र, डिसेंबर 2021 पर्यंत मतदान आणि मतमोजणी पूर्ण होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सतेज पाटील यांच्याविरोधात उमेदवार अद्याप निश्चित नाही.

भाजप आघाडीकडून निकराचा लढा देण्याचा प्रयत्न होणार असला तरी महाडिक कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरल्यास रंगत वाढणार आहे. या सर्व घडामोडीत जिल्हा बँकेच्या राजकारणाचे पडसाद विधान परिषदेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.

मागील सहा वर्षांत जिल्ह्याच्या राजकीय स्थितीत कमालीचा बदल झाला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सतेज पाटील यांच्याकडे एकही सत्ताकेंद्र नव्हते. पण त्यानंतर महापालिका निवडणुकीत 29 जागांवर विजय मिळवत सतेज पाटील यांनी जोरदार कमबॅक केला. दुसरीकडे सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सर्वच सत्ताकेंद्रात सहभाग असलेल्या महाडिक कुटुंबाला खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यासह गोकुळ दूध संघाच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्याने सतेज पाटील यांना हक्काच्या सुमारे 45 मतांना मुकावे लागले आहे. या बदललेल्या राजकीय परिस्थितीत होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे. जिल्हा बँक निवडणुकीत राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याविरोधात शिरोळ तालुक्यात सर्वपक्षीयांनी मोट बांधली आहे. यड्रावकर यांची जयसिंगपूर पालिकेत निर्णायक ताकद आहे. त्यामुळे यड्रावकर गटाची विधान परिषद निवडणुकीतील भूमिका जिल्हा बँकेच्या निकालावर ठरण्याची शक्यता आहे. आ. विनय कोरे यांच्याकडे सुमारे 22 हून अधिक मते आहेत. जिल्हा बँकेबाबत कोरे गटाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. इचलकरंजी नगरपालिकेत स्वतंत्र गट आणि दोन जि. प. सदस्य असलेला आवाडे गट मागील निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पाठीशी होता. सध्या आ. प्रकाश आवाडे राज्याच्या राजकारणात भाजपसोबत आहेत.

राज्यात आकारास आलेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला विधान परिषद निवडणुकीत कायम राहिल्यास पालकमंत्री पाटील यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बळ मिळू शकते. त्याचबरोबर विधान परिषद निवडणुकीत पक्षीय पातळीपलीकडे जाऊनही मोर्चेबांधणी केली जात असल्याचे सध्याचे चित्र आहे.

पाटील-महाडिक लढत

विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत 31 डिसेंबर 2015 ला काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांचा 63 मतांनी पराभव केला. पाटील यांना 220 तर महाडिक यांना 157 मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधातील उमेदवार कोण असेल, यावरच लढत रंगतदार होणार की एकतर्फी होणार, हे स्पष्ट होणार आहे.

Back to top button