राज्यात २५ धरणे कोरडी; ३७ धरणांनी गाठलाय तळ

राज्यात २५ धरणे कोरडी; ३७ धरणांनी गाठलाय तळ
Published on
Updated on

कोल्हापूर :  राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान अशा सर्व प्रकारच्या धरणांमध्ये मिळून अवघा 19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 25 धरणे कोरडीठाक पडली असून 37 धरणांमधील पाण्याने तळ गाठला आहे. अन्य धरणांमध्येही आजघडीला अत्यल्प पाणीसाठा आहे. आणखी आठ-दहा दिवस जरी पाऊस लांबला तरी अवघ्या राज्याच्याच घशाला कोरड पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यातील 139 मोठ्या, 260 मध्यम आणि 2594 लहान अशा 2993 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 48017.62 दशलक्ष घनमीटर (1695.71 टीएमसी) एवढी आहे. मात्र आज रोजी या सर्व धरणांमध्ये मिळून 9282.97 दशलक्ष घनमीटर (327.82 टीएमसी) एवढाच म्हणजे केवळ 19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या राज्यातील खडकपूर्णा, बोरगाव-ऐनापूर, शिरसमार्ग, वांगदरी, सिद्धेश्वर, गुंजरगा, किल्लारी, लिंबाळा, मदनसुरी, राजेगाव, सीना-कोळेगाव, तगरखेडा, भुसनी, बिंदगीहाळ, कर्सा-पोहरेगाव, साई, टाकळगाव-देवळा, भाम, तिसगाव, वाकी, दूधगंगा, पिंपळगाव-जोग, घोड, लोणावळा आणि उजनी ही धरणे एक तर कोरडीठाक पडली आहेत किंवा त्या धरणातील पाणी मृतसंचय पातळीच्या खाली गेले आहे. परिणामी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या अनेक गावांमध्ये 'पाणीबाणी' निर्माण झाल्याचे दिसत आहे. परिसरातील बहुतांश नद्यांवर उपसाबंदी लागू करण्यात आलेली आहे.

आपेगाव, धानेगाव, डोंगरगाव, रोशनपुरी, आगदुरा, दिगडी, हिरडपुरी, जोगळादेवी, किनवट, लोणीसावंगी, मांगरूळ, मुदगल, राजटाकळी, औरद, खुलगापूर, नागझरी, शिवनी, वांजरखेडा, कावडस, डोलनहाळ, लोअरचोंधे, घाटघर, कालीसरार, सिदपूर, नंद, मुसळवाडी, भावली, चंकपूर, कडवा, पालखेड, वाघर, तिल्लारी, तुळशी, नीरा-देवधर, वडज, टेमघर, वलवण आणि कुंडली या धरणांमधील पाण्यानेही तळ गाठला आहे. आगामी काही दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर ही धरणेसुद्धा कोरडी ठणठणीत पडण्याचा धोका आहे. परिणामी या धरण क्षेत्रातील जिल्हा प्रशासनाने धरणांमधील पाणीसाठा राखून ठेवला असून बहुतांश ठिकाणी शेतीसाठी उपसाबंदी लागू करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या कोयना धरणात फक्त सहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील काही प्रमुख धरणांमध्ये तर केवळ अर्धा ते एक टीएमसी किंवा त्याहून कमी एवढाच पाणीसाठा आहे. पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ 11 टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागात धरणांची संख्या जास्त असली तरी पाणीसाठ्याची टक्केवारी कमी दिसून येत आहे. पुणे विभागात मोठी, मध्यम व लहान अशी एकूण 720 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मिळून आज 1783.40 दशलक्ष घनमीटर (62 टीएमसी) पाणीसाठा आहे. अमरावती, औरंगाबाद, कोकण, नाशिक आणि नागपूर विभागातील धरणांमधील पाणीसाठ्यांची अवस्थाही चिंताजनक स्वरूपाचीच आहे. गेल्यावर्षी याच तारखेला या धरणांमधील पाणीसाठा जवळपास दहा टक्क्यांनी जादा होता. पण यंदा पावसाने ओढ दिल्याने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याचे दिसत आहे.

सध्या कोयना धरणात अवघा 6 टीएमसी पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवावा लागणार आहे. परिणामी नजीकच्या काही दिवसांतच कोयनेतून होणार्‍या वीजनिर्मितीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पावसाअभावी राज्याच्या बहुतांश भागातील खरीप पेरण्याची कामे खोळंबून पडली आहेत. कोकण पट्ट्यातील काही भागांत करण्यात आलेल्या भाताच्या धूळ पेरण्याही पावसाअभावी धोक्यात आल्याच्या दिसत आहेत. दोन-चार दिवसांत पावसाचे आगमन झाले नाही तर या धूळ पेरण्या वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. विहिरी बागायत भागातील काही ठिकाणी पाणी देऊन खरिपाच्या पेरण्या करण्याची लगबग दिसून येत आहे. मात्र राज्याचा विचार करता अजून चार-पाच टक्के क्षेत्रावरही पेरण्या झालेल्या नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news