शाहूवाडी : बिबट्यांचा उपद्रव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा; तहसीलदारांची वनाधिकाऱ्यांना सूचना | पुढारी

शाहूवाडी : बिबट्यांचा उपद्रव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा; तहसीलदारांची वनाधिकाऱ्यांना सूचना

सरुड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यात जंगली श्वापदांचा नैसर्गिक अधिवासाबाहेर नागरी भागातील वाढता संचार आणि त्यातून होणारा उपद्रव रोखण्यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना करावी, अशा सूचना तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी वनाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विशेषतः बिबट्याची भ्रमंती आढळून आलेल्या परिसरातील गावांमध्ये महसूल आणि ग्राम प्रशासनाच्या यंत्रणेला सोबत घेऊन जनजागृती मोहीम राबविण्याबाबत तहसीलदारांनी वनविभागाला सतर्क केले आहे.

शाहूवाडी तालुक्यातील पिशवी, सरुड, कापशी, हारुगडेवाडी पैकी गुळवणेवाडी आदी ठिकाणी मागील दहाबारा दिवसात बिबट्याचा मुक्त संचार आढळून येत आहे. यामुळे स्थानिक शेतकरी, पशुपालक, मेंढपाळ हे भयभीत वातावरणात वावरत आहेत. याची तहसीलदार चव्हाण यांनी दखल घेत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांची सोमवारी (दि. १९) तहसीलदार कार्यालयात तातडीची बैठक घेतली. यामध्ये नागरी भागालगत संचार आढळून आलेले बिबटे तातडीने मूळ नैसर्गिक अधिवासात परतवण्याची मोहीम हाती घेण्याबाबत तसेच दक्षतेच्या वनविभागाला सूचना दिल्या. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र मोरे, वनाधिकारी अमित भोसले, बांबवडेचे वनपाल महेबूब नायकवडी, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते.

दरम्यान, वनविभागाच्या जिल्हा कार्यालयाकडून प्राथमिक प्रतिसाद चमू (आरआयटी) तालुक्यात दाखल झाला आहे. विशेष प्रशिक्षित चमूच्या माध्यमातून श्वापद पीडित गावांमध्ये जनजागृती मोहीम सुरू केल्याचे मलकापूर परिक्षेत्र वनाधिकारी अमित भोसले यांनी बैठकीत सांगितले. बांबवडे मंडळातील पिशवी, खोतवाडी या गावातील जनजागृती कार्यक्रम पूर्ण झाला आहे. पाठोपाठ सरुड मंडळातील गावांमध्ये सोमवारी सायंकाळ पासून जनजागृती कार्यक्रमाची आखणी केली असल्याचे सांगितले.

ट्रॅप कॅमेरेही बसविणार!

दरम्यान, बिबट्याचा संचार आढळून आलेल्या परिसरात माहिती पत्रके वाटप, दवंडी, गस्त सुरू केली आहे. भ्रमंती मार्गावर काही ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याची हालचाल टिपण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच गरज वाटल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार बिबट्याला जेरबंद करण्याबाबत आवश्यक परवानगीसाठी पुणे कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असल्याची माहितीही मलकापूर परीक्षेत्र वनाधिकारी अमित भोसले यांनी दिली.

जनजागृती बरोबरच बिबट्यांची शोध मोहीम राबवून शेतकरी, पशुपालक नागरिकांना भयमुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. विशेषतः बिबट्या पिंजराबंद करण्याच्या कार्यवाही बाबतीत आवश्यक हालचाली करण्यासाठी वनविभागाच्या पुणे कार्यालयाला पत्राद्वारे कळविले आहे.
– रामलिंग चव्हाण, तहसीलदार, शाहूवाडी

Back to top button