Kolhapur News : वडणगे येथील तलाव क्षेत्रातील भूखंडाचा अहवाल सादर करा: जिल्हाधिकाऱ्यांचे प्राधिकरणाला आदेश | पुढारी

Kolhapur News : वडणगे येथील तलाव क्षेत्रातील भूखंडाचा अहवाल सादर करा: जिल्हाधिकाऱ्यांचे प्राधिकरणाला आदेश

वडणगे: पुढारी वृत्तसेवा: वडणगे (ता. करवीर) येथील तलावाच्या पश्चिमेकडील पाणलोट क्षेत्राला लागून झालेल्या भूखंड प्रकल्पाचा अहवाल त्वरित सादर करावा, असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर विकास प्राधिकरणाला दिला आहे.
वडणगे येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन शिव-पार्वती तलावाच्या पश्चिमेला झालेल्या नियमबाह्य भूखंड प्रकल्पाबाबत माहिती दिली. त्यानंतर रेखावार यांनी तातडीने प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून येथील भूखंड प्रकल्पाचा त्वरित अहवाल देण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर प्राधिकरणाचे सहाय्यक नगर रचना अधिकारी सचिन ताटे यांनी वडणगे तलावाला त्वरित भेट (Kolhapur News) दिली.

तलावाच्या पश्चिम दिशेला पाणलोट क्षेत्रात नियम डावलून झालेल्या भूखंडाबाबत येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या सदस्यांनी १ जून रोजी प्राधिकरण अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर समितीच्या सदस्यांना प्राधिकरणाकडून या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करू, असे सांगितले होते. पंधरा दिवसानंतरही याबाबत प्राधिकरणाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा (Kolhapur News) केली.

Kolhapur News : वडणगे तलाव जैव विविधतेने संपन्न

वडणगे तलाव सुमारे ३२ एकरात विस्तारलेला आहे. तो जैव विविधतेने संपन्न आहे. तलावाच्या पश्चिम दिशेला काही वर्षांपूर्वी झालेल्या बांधकामामुळे तलाव सध्या पूर्ण प्रदूषित झाला आहे. तलावाच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अगदी खेटून सध्या नियमबाह्य भूखंड पाडण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात तलाव पूर्ण प्रदूषित होऊन तलावाचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे, असे कृती समितीच्या सदस्यांनी रेखावार यांना सांगितले.

प्राधिकरणाच्या बांधकाम नियमावलीनुसार नैसर्गिक जलस्त्रोत्रापासून १०० मीटर अंतरामध्ये भूखंड व बांधकाम करण्यास मनाई करावी. येथे पूर्वी झालेल्या बांधकामाचे सांडपाणी तलावात सोडणाऱ्या रहिवासी व विकसक यांना प्रतिबंध करावा. तसेच या ठिकाणी रहिवाशी क्षेत्र करण्यास कोणाकडून परवानगी देण्यात आली? परवानगी दिली असेल, तर ती कोणत्या नियमाच्या आधारे दिली ? याचीही चौकशी व्हावी. या तलावामध्ये अतिक्रमण होऊ नये, यासाठी संपूर्ण तलावाची शासकीय मोजणी करण्यात यावी. व तलावाच्या हद्दीत झालेली अतिक्रमणे हटवावी. आदी मागण्या यावेळी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या.

यावेळी कृती समितीचे राजू पोवार, दिलीप प्रभावळे, दादासो शेलार, सुनील परीट, रवी मोरे, शिरीष कुंभार, सचिन मगदूम, मोहन पाटील, तानाजी शिंदे, पोपट बोने, उमेश नांगरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button