

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी लागणार्या मुदतबाह्य सर्जिकल ब्लेडस्ची खरेदी करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. एका परिचारिकेच्या जागरुकतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले असले, तरी मोठ्या दबावाखाली ते दडपले जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात खरेदी करण्यात आलेली ही सर्जिकल ब्लेडस् जिल्हा नियोजन व विकास मंडळाने (डीपीडीसी) दिलेल्या निधीतून खरेदी करण्यात आल्याचे समजते. 170218 बॅच नंबरच्या या ब्लेडस्चे उत्पादन फेब्रुवारी 2018 मध्ये करण्यात आले होते आणि त्याची वापराची मुदत 5 वर्षांनी म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये संपुष्टात आली. डीपीडीसीच्या या निधीतून खरेदीच्या ऑर्डर्स मार्च महिन्याच्या अखेरीस देण्यात आल्या. यानुसार पुरवठादाराने संबंधित मालाचा पुरवठा रुग्णालयाला केला.
रुग्णालयाच्या प्रशासनाची हा माल स्वीकारताना त्याच्या उत्पादन व मुदतबाह्यता दिनांकाची खातरजमा करून घेणे आवश्यक होते. प्रत्यक्षात अशी खातरजमा न करता माल स्वीकारला गेला. त्याहीपेक्षा जेव्हा वॉर्डस्मधून त्याचे मागणीपत्र येते, तेव्हाही खातरजमा करण्याची गरज होती. मागणीपत्राप्रमाणे ब्लेडस् शस्त्रक्रियागृहामध्ये रवाना झाली. काहींचा वापरही झाला असेल; पण एका शस्त्रक्रियागृहातील प्रमुख अधिपरिचारिकेच्या जागरुकतेमुळे हे प्रकरण उजेडात आले. जर वॉर्ड तपासणीमध्ये संबंधित मुदतबाह्य उत्पादन निदर्शनास आले असते, तर अधिपरिचारिकेवर कारवाई झाली असती. यामुळे तिने तत्परतेने संबंधित उत्पादनाचा तपशील रुग्णालयाच्या व्हॉटस् अॅप ग्रुपवर टाकल्यामुळे हे गंभीर प्रकरण उजेडात आले आहे.
पुरवठा कोणी केला? स्वीकारले कोणी? नियंत्रण कोणाचे? प्रकरण दडपण्यासाठी ताकद कोण लावतो? संगनमताने अशा किती औषधांची खरेदी सुरू आहे? बिले तत्काळ कशी निघतात? साहित्य खरेदीसाठी समितीच्या बैठका किती वेळा झाल्या? या प्रश्नांची उत्तरे आवश्यक आहेत.