महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अ‍ॅड. विवेक घाटगे नवे अध्यक्ष | पुढारी

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अ‍ॅड. विवेक घाटगे नवे अध्यक्ष

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा या राज्य वकील परिषदेच्या अध्यक्षपदी येथील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. विवेक घाटगे व उपाध्यक्षपदी मुंबईतील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. डॉ. उदय वारुंजीकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र व गोवा राज्य परिषद कार्यकारिणीच्या रविवारी कोल्हापूर येथे झालेल्या विशेष सभेत निवडीवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. अ‍ॅड. घाटगे यांच्या रूपाने 24 वर्षांनंतर कोल्हापूर जिल्ह्याला दुसर्‍यांदा अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा या राज्य वकील परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यकारिणी सदस्यांची विशेष सभा कोल्हापूर येथे बोलावण्यात आली होती. कार्यकारिणीतील 25 पैकी 16 सदस्य बैठकीला उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्या नावाला अ‍ॅड. वसंतराव भोसले व अ‍ॅड. सुभाष घाटगे, तर उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. डॉ. उदय वारुंजीकर यांना अ‍ॅड. गजानन चव्हाण व अ‍ॅड. विठ्ठल कोंडे-देशमुख यांनी सूचक व अनुमोदन दिले. अ‍ॅड. घाटगे व अ‍ॅड. वारुंजीकर यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी एकमताने निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

निवडीनंतर बोलताना अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा या राज्य वकील परिषदेच्या अध्यक्षपदाची विश्वासार्हतेने सोपविलेली धुरा निश्चितपणे यशस्वीपणाने पार पाडेन, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी अखंडपणे चाळीस वर्षांपासून वकील, पक्षकारांसह सामान्य जनतेचा लढा सुरू आहे.

अलीकडच्या काळात कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागामुळे हा विषय अंतिम टप्प्यावर आला आहे. कोल्हापूरला खंडपीठाची स्थापना होणे ही काळाची गरज आहे. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात खंडपीठासाठी प्राधान्याने प्रयत्न राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या कार्याची व्याप्ती वाढवून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन वकील, पक्षकार मंडळींशी संपर्क साधण्यावर भर राहील, असेही त्यांनी सांगितले.

उपाध्यक्ष अ‍ॅड. वारुंजीकर म्हणाले, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या कामाची व्याप्ती वाढविण्यासाठी पदाधिकार्‍यांसह कार्यकारिणी सदस्यांनी अधिकाधिक कालावधी देण्याची गरज आहे. मिळालेल्या संधीचे आपण सर्वांनीच सोने करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा या राज्य वकील परिषदेच्या विशेष सभेसाठी अ‍ॅड. मिलिंद पाटील (धाराशिव), अ‍ॅड. संग्राम देसाई (सिंधुदुर्ग), जयंत जयभावे (नाशिक), अ‍ॅड. गजानन चव्हाण (ठाणे), अ‍ॅड. हर्षद निंबाळकर (पुणे), मिलिंद थोबडे (सोलापूर), अ‍ॅड. वसंतराव भोसले (सातारा), अ‍ॅड. अनिल गोवारदीपे (नागपूर), अ‍ॅड. सुभाष घाटगे (मुंबई), अ‍ॅड. विठ्ठल कोंडे-देशमुख (मुंबई), अ‍ॅड. असिफ कुरेशी (नागपूर), अ‍ॅड. अशिष देशमुख (यवतमाळ), राजेंद्र उमाप (पुणे), पारिजात पांडे (नागपूर) आदी उपस्थित होते.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर खंडपीठासाठी आग्रही भूमिका कोल्हापूर खंडपीठासाठी चाळीस वर्षांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांत सुरू असलेल्या लोकलढ्याला दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सामाजिक बळ दिले आहे. त्यांच्यामुळेच खंडपीठ, सर्किट बेंच स्थापनेचा विषय अंतिम टप्प्यावर आला आहे. खंडपीठासाठीच्या आजवर झालेल्या उच्चस्तरीय बैठका डॉ. जाधव यांच्या प्रयत्नामुळे झालेल्या आहेत. डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काही दिवसांत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. डॉ. जाधव यांच्या प्रयत्नांमुळेच कोल्हापूर खंडपीठ लवकरच साकारेल, अशी अपेक्षा बार कौन्सिलचे नूतन अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी व्यक्त केली.

Back to top button