कोल्हापूर लोकसभा : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे), भाजपच्या दाव्याने चुरस | पुढारी

कोल्हापूर लोकसभा : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे), भाजपच्या दाव्याने चुरस

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कोण लढणार, याची चर्चा सुरू होता होता उमेदवारांची रांग लागली. आता तर चुरस एवढी वाढली की, काँग्रेस आणि भाजप या दोघांनीही आपापल्या मित्रपक्षांचा दावा खोडून काढत या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे.

सध्या शिवसेनेतून निवडून आलेले व शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले संजय मंडलिक या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी तत्कालीन खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक यांचा पराभव केला. काळाच्या ओघात काय घडले, हे कोणालाच सांगता येत नाही. आता तर मंडलिक आणि महाडिक हे युतीतील सहप्रवासी आहेत. उद्या मंडलिक यांना युतीतून उमेदवारी मिळाली, तर धनंजय महाडिक यांना त्यांचा प्रचार करावा लागेल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांचा महाडिक यांनी पराभव केला होता, तर 2019 च्या निवडणुकीत मंडलिक यांनी महाडिक यांना पराभूत करून आपल्या पराभवाचे उट्टे काढले. आता युतीतून उमेदवारी आणि प्रचारातील भागीदारी हाच कळीचा मुद्दा ठरला आहे.

त्याचबरोबर मतदारसंघावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. 1999 पासून राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ आहे. तो 2009 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिला. 2009 मध्ये राष्ट्रवादीने संभाजीराजे यांना उमेदवारी दिली. त्यांचा सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पराभव केला. मंडलिक पुढे काँग्रेसचे सहयोगी सदस्य राहिले. या मुद्द्याला धरून काँग्रेस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर हक्क सांगत आहे.

1999 ते 2009 आणि त्यानंतर पुढे मधल्या पाच वर्षांचा अपवाद वगळता 2014 मध्ये पुन्हा राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक विजयी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी या मतदारसंघावरील हक्क सोडायला तयार नाही. 2019 मध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी झाले, तरी ‘आमचं ठरलंय’ म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाडिक यांच्या पराभवासाठी मंडलिक यांना उघड पाठिंबा दिला होता.

मंडलिक शिवसेनेतून शिंदे यांच्या गटात गेले आहेत. ते ज्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले आहे ते चिन्ह आणि शिवसेना हे नाव आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. विद्यमान खासदारांना उमेदवारी द्यावी लागेल, असे असले तरी भाजपही या मतदारसंघावर दावा सांगत आहे. भाजपने लोकसभेची जागा कधीही जिंकलेली नाही; मात्र धंनजय महाडिक आता भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. आपल्याकडे तगडा उमेदवार असल्याचा भाजपचा दावा आहे. भाजपला एक संधी मिळाली पाहिजे असे त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्याच्या काळात संजय मंडलिक यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागणार का, अशी चर्चा सुरू झाली. त्याचे मंडलिक यांनी खंडण केले.

मात्र, लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना शिंदे गट हे आघाडीवर आहेत. जागा वाटपाची चर्चा युती आणि आघाडीत होईल त्यावेळी पूर्वीचे विजय-पराभव यांचा अभ्यास करून मतदारसंघ कोणाकडे सोपवायचा, याचा निर्णय युती आणि आघाडीचे नेते घेतील. तूर्त मात्र दावे-प्रतिदावे सुरूच आहेत आणि त्यावरून राजकीय संघर्ष होणार, याची चुणूक दिसत आहे.

Back to top button