स्वराज्यप्रेरिका म्हणून जिजाऊंचे महत्त्व अतुलनीय | पुढारी

स्वराज्यप्रेरिका म्हणून जिजाऊंचे महत्त्व अतुलनीय

कोल्हापूर, सागर यादव : मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही या जुलमी राजवटींत रयतेच्या स्वराज्यनिर्मितीचा विचार कृतीत आणण्यासाठी शहाजीराजे भोसले यांना भक्कम साथ मिळाली ती त्यांच्या पत्नी जिजाऊंची. किंबहुना, शिवछत्रपतींच्या माध्यमातून स्वराज्याचे स्वप्न जिजाऊंनी साकारले. अत्यंत प्रतिकूल अशा कौटुंबिक, सामाजिक व राजकीय वातावरणात बहुजन समाजाच्या उद्धारासाठी स्वराज्याची मुहूर्तमेढ जिजाऊंनी रोवली. 1642 ते 1674 या साडेतीन दशकांच्या कालखंडात बहुजन समाजातील तरुणांना, शेतकर्‍यांना, अठरापगड जाती-जमातींना एकत्र करून शिवछत्रपतींसारखा आदर्श राजा घडवला. मराठ्यांचा इतिहास घडवणारी स्वराज्यप्रेरिका म्हणून त्यांचे महत्त्व अतुलनीय आहे.

प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल

1630 ते 1642 या एका तपाच्या कालखंडात जिजाऊंचे जीवन अत्यंत धावपळीत गेले. कधी शिवनेरी, सिंधखेड, बेंगलोर अशी त्यांची भटकंती झाली. खंडागळे हत्ती प्रकरणात भोसले-जाधवराव घराण्यात प्रचंड संघर्ष झाला, यात जिजाऊंना प्रचंड मानसिक त्रास झाला. देवगिरी किल्ल्यावर थोरले बंधू, भाचे यांची एकाचवेळी हत्या झाली.

स्वराज्यनिर्मितीत महत्त्वाचे योगदान

स्वराज्यावर चालून आलेल्या शाहिस्तेखान, अफजलखान, दिलेरखान, मिर्झाराजे अशा एकामागून एक संकटावेळी त्या शिवरायांसोबत खंबीरपणे उभ्या होत्या. शिवछत्रपतींना स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ला जिंकण्यास जिजाऊंची प्रेरणा होती. शिवबा स्वराज्यात नसताना कोंढाणा किल्ला जिंकण्याचे आदेश तानाजी मालुसरे यांना जिजाऊंनीच दिले. अफजलखान प्रकरणातही जिजाऊंची प्रेरणा, डावपेच यशस्वी ठरले. वयाच्या 62 व्या वर्षी (सन 1660) पन्हाळ्याला असणारा सिद्दी जोहरचा वेढा फोडण्याचे आदेश जिजाऊंनी नेताजी पालकर यांना दिले होते. ते अपयशी ठरल्यावर स्वत: जिजाऊंनी मोहिमेवर जाण्याचा निश्चय केला होता. सन 1666 मध्ये महाराज आग्रा येथे कैदेत असताना स्वराज्याचा कारभार त्यांनी अत्यंत कौशल्याने सुरू ठेवला होता.

बहुजन समाजाला एकवटले

शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेची जबाबदारी मोठ्या विश्वासाने जिजाऊंवर सोपवली होती. त्यांनी भरकटलेला बहुजन समाज स्वराज्यासाठी एकत्रित केला. स्वराज्याचा गाडा हाकत त्यांनी शेतीसाठी विशेष कार्य केले. शेतकर्‍यांना औजारे, धान्य पुरवणे, पाण्याची व्यवस्था, कर्जमुक्ती, मुला-मुलींचे विवाह, अशी विविध कामे केली. सर्व जाती-धर्म, अठरापगड मावळ्यांना एकत्र करून स्वराज्यनिर्मितीच्या कार्याला बळ दिले.

सुधारणावादी जिजाऊ

17 व्या शतकात जिजाऊंनी सुधारणावादी व परिवर्तनवादी विचार मांडत क्रांतिकारी निर्णय घेतले. सन 1664 मध्ये शहाजीराजे यांचा मृत्यू झाला. त्यावेळी तत्कालीन अनिष्ट प्रथेप्रमाणे पतीच्या मृत्यूनंतर सती न जाता रयतेच्या कल्याणकारी स्वराज्याच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले. जिजाऊंनी अंधश्रद्धा झुगारून देत पुण्याची पुनर्रचना केली. लाल महाल बांधून तेथून कारभार सुरू केला.

Back to top button