अमेरिकेतील प्रदर्शनात कोल्हापूरचा वारसा | पुढारी

अमेरिकेतील प्रदर्शनात कोल्हापूरचा वारसा

कोल्हापूर; सागर यादव :  इसवी सन 200 ते इ.स. पूर्व 200 अशा सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास सांगणार्‍या ऐतिहासिक वस्तूंनी परिपूर्ण अशी कोल्हापूर वस्तुसंग्रहालय म्हणजेच टाऊन हॉल म्युझियमची ओळख आहे. कलानगरी कोल्हापुरातील कलासंपन्न अशा संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तू परदेशातील संग्रहालयात प्रदर्शीत होणार आहेत.

अमेरिका-न्यूयॉर्क येथील द मेट (मेट्रोपोलिटीन) म्युझियम ऑफ आर्ट या संग्रहालयात दि. 17 जुलै ते 13 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्राचीन बौद्ध संस्कृतीवर आधारित ‘द इव्हॉल्यूशनर ऑफ अर्ली बुद्धिष्ट आर्ट इन इंडिया’ या विषयावर प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. यात जगभरातील विविध वस्तुसंग्रहालयातून बौद्ध संस्कृती संदर्भातील माहिती देणार्‍या कलाकृतींचा समावेश असणार आहे. या प्रदर्शनात कोल्हापूर वस्तुसंग्रहालयातील (टाऊन हॉल म्युझियम) आठ ऐतिहासिक कलाकृतींना स्थान मिळणार आहे. यात समुद्रदेवता, हत्तीवरील स्वार, जैन शुभ चिन्हे, रोमन पदक, खेळण्यातील गाडा, भांड्याचे नक्षीदार दांडे आदी वस्तूंचा समावेश असणार आहे.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयाच्या (नॅशनल म्युझियम) समन्वयाने जागतिक संग्रहालयातील करार व लोन पद्धतीने या वस्तू प्रदर्शनाकरिता पाठविण्यात येणार आहेत. प्रथमच कोल्हापुरातील ऐतिहासिक वस्तू प्रदर्शनासाठी परदेशात जात असल्याची माहिती कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे यांनी दिली.

दोन हजार वर्षांचा इतिहास

संग्रहालयात इ.स. 200 ते इ.स. पूर्व 200 या कालावधीतील समुद्र देवता, रोमन पदक, प्राचीन काळी कोल्हापूरचा जगभराशी असणार्‍या व्यापार संबंधांची माहिती देणारा नकाशा (समुद्र मार्ग), प्राचीन हिंदू-जैन धर्मातील देवतांच्या मूर्ती, विविध कालावधीतील शस्त्रास्त्रे, शिल्पाकृती, आदी ऐतिहासिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. सुमारे दोन हजार वर्षांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारे संग्रहालय असे कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे महत्त्व असल्याची माहिती सुर्वे यांनी दिली.

कोल्हापूर वस्तू संग्रहालयाची स्थापना

सन 1945-46 च्या दरम्यान कोल्हापूरातील पंचगंगा नदीकाठी असणार्‍या प्राचीन ब—म्हपूरी टेकडी परिसरात कोल्हापूर संस्थानचा पुरातत्व विभाग व डेक्कन कॉलेज पुणे यांच्यावतीने उत्खनन करण्यात आले. उत्खननात सापडलेल्या वस्तूंसाठी 30 जानेवारी 1946 मध्ये कोल्हापूर वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. पुढे 1949 मध्ये टाऊन हॉल उद्यानातील ‘कोल्हापूर नगर मंदीर’ येथे हे वस्तू संग्रहालय नेण्यात आले.

Back to top button