छत्रपती उदयनराजे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट | पुढारी

छत्रपती उदयनराजे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज व राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी रविवारी कोल्हापुरात येऊन दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राजघराण्याशी असलेल्या ‘पुढारी’ परिवाराच्या व डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याला नव्याने उजाळा मिळाला.

खा. छत्रपती उदयनराजे यांचे वडील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले व ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे अत्यंत मित्रत्वाचे संबंध होते. या मैत्रीचे अनेक पदर डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी उलगडले. उदयनराजेंच्या लहानपणी जलमंदिर पॅलेसमध्ये डॉ. प्रतापसिंह जाधव व प्रतापसिंह महाराज यांच्या अनेकदा झालेल्या भेटीचे किस्से तसेच त्यांच्याबरोबर कास, प्रतापगड, कोकणात शिकारीसाठी केलेली भ्रमंती याचेही किस्से यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी छत्रपती उदयनराजे यांना सांगितले. प्रतापसिंह महाराजांना असलेले शिकारीचे वेड, गाड्यांचा छंद, त्यांची करारी वृत्ती यावर डॉ. प्रतापसिंह जाधव भरभरून बोलत असताना उदयनराजे अक्षरश: भारावून गेले. उदयनराजेंच्या राजकीय प्रवेशापासून ते आत्तापर्यंत डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केलेल्या मार्गदर्शन व आशीर्वादाबद्दल उदयनराजे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

महाराष्ट्रातील अनेक सामाजिक विषयांना तुमच्यामुळे वाचा फुटली. सत्ता कोणाचीही असो, तुम्ही कोणाचाही मुलाहिजा बाळगला नाही. तुमची ही तडफदार वृत्तीच मला भावते. तोच आदर्श घेऊन जे जे चुकीचे सुरू असते, त्यावर मी प्रहार करत असतो. भविष्यातही आपले असेच मार्गदर्शन मला मिळावे, अशी अपेक्षा खा. उदयनराजे यांनी

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडे व्यक्त केली. ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांचा ‘यंग, एनर्जेटिक, डायनॅमिक’ अशा शब्दांत गौरव करत ‘पुढारी’ची पुढचीही वाटचाल निश्चितच देदीप्यमान असेल, अशा शब्दांत डॉ. योगेश जाधव यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या कुटुंबाचे व राजघराण्याच्या असलेल्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या अनेक घटनांना नव्याने उजाळा मिळाला. सुमारे एक तासाच्या या चर्चेत डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी उदयनराजेंना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी ‘पुढारी’चे सातार्‍याचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, जि. प.चे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सुनील काटकर, सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक काका धुमाळ हेही उपस्थित होते.

Back to top button