शाळांची घंटा आजपासून घणघणणार | पुढारी

शाळांची घंटा आजपासून घणघणणार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  दीड महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर गुरुवारी (दि. 15) जिल्ह्यातील शाळा सुरू होत आहेत. मुलांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सवाचे सोहळे साजरे करून पहिल्याच दिवशी मुलांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत.

शाळेत प्रथमच पाऊल टाकणार्‍या नवागत बालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबविण्यात येणार्‍या समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाची तसेच डिजिटल शाळा, डिजिटल वर्ग, आय.एस.ओ. मानांकित शाळा, शाळासिद्धी, स्वच्छ सुंदर शाळा अशा उपक्रमांची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये सुरू आहे. शंभर टक्के पटनोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना, अशा योजना शाळांमध्ये राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थीहिताच्या योजनांना पालकांनी साथ दिल्यास विद्यार्थी व शाळांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.

मनपाच्या 58 शाळा आज सुरू

महापालिकेच्या 58 शाळांमध्ये गुरुवारी पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. 10 हजार 500 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. सर्व शाळांमध्ये प्रवशोत्सव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Back to top button