असा येतो मान्सून… जाणून घ्या अधिक | पुढारी

असा येतो मान्सून... जाणून घ्या अधिक

कोल्हापूर; आशिष शिंदे :  सुमारे सतराशे वर्षांपासून ठराविक महिन्यातच पडणारा पाऊस ही भारतीय भूभागातील एक विशेष घटना आहे. तोच सारेजण वाट पाहत असणारा मान्सून होय; मात्र यंदा आपण मान्सूनचे केवळ काऊंटडाऊन ऐकत आहोत प्रत्यक्ष मान्सूनचा पत्ताच नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार कोल्हापुरात पावसानेे दांडी मारली आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा 1 जूनपासून 11 जून अखेर 91 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. यावेळी 11 जूनपर्यंत केवळ 6.8 मि.मी. पाऊस पडला आहे. या कालावधीमधील नेहमी पडणारा पाऊस (नॉर्मल रेंज) 78.2 मि.मी. इतका असतो.

असा तयार होतो मान्सून

वातावरणातील बदलामुळे दिशा बदलणारी हवा आपल्यासोबत पाऊस घेऊन येते. सूर्य विषुववृत्ताच्या वर असताना उन्हाळ्यामध्ये हिंद महासागरात मान्सून तयार होतो. या प्रक्रियेत समुद्राचे तापमान 30 अंशांपर्यंत पोहोचते तर याच कालावधीत पृथ्वीचे तापमान 45 ते 46 अंशांवर गेलेले असते. यामुळे हिंदी महासागराच्या दक्षिण भागात मान्सूनचे वारे सक्रिय होतात. याच कालावधीत समुद्रावर ढग तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. या काळामध्ये जमिनीचे तापमान  समुद्राच्या पाण्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. जिथे हवा गरम तिथे कमी दाब तर जिथे हवा थंड तिथे हवेचा दाब अधिक. यामुळेच हवेची दिशा बदलते. परिणामी समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वारे वाहू लागते. हे वारे समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनाने निर्माण झालेले बाष्प शोषून घेतात आणि हेच वारे पाऊस घेऊन येतात.

जून महिन्यातील उच्चांक

कमाल तापमान – 40 अंश (1/06/1987)
किमान तापमान – 17.6 अंश (30/06/2007)
सर्वोच्च पाऊस – 661.9 मि.मी. (2006)
 सर्वात कमी पाऊस – 7.6 मि.मी. (2009)
24 तासांतील सर्वाधिक पाऊस – 151.2 मि.मी.
(26/06/2007)

मान्सूनच्या दोन धारा

मान्सूनचे हे वारे जेव्हा भारतामध्ये येताता तेव्हा त्याच्या दोन मुख्य धारा तयार होतात. एक धारा अरबी समुद्राकडे जाते, तर दुसरी बंगालच्या उपसागराकडे. अरबी समुद्राच्या बाजूने येणारे मान्सूनचे वारे पश्चिम घाटावरून पुढे जातात आणि दक्षिणेकडील पठाराकडे जातात. तर बंगालच्या उपसागरातून वाहणारे वारे भारतीय खंडात प्रवेश करतात.

मान्सूनचे दोन प्रकार

भारतात नैऋत्य मान्सून अर्थात उन्हाळी मान्सून आणि उत्तर-पूर्व मान्सून म्हणजेच हिवाळा मान्सून असे दोन प्रकार आहेत. दक्षिण-पश्चिम वारे जून ते सप्टेंबर आणि उत्तर-पूर्व वारे ऑक्टोबर ते मध्य मे दरम्यान वाहतात.

मूळ शब्द अरबी

मान्सून हा शब्द अरबी भाषेतील ‘मौसिम’ या शब्दातून तयार झाला आहे. याच ‘मौसिम’पासून हिंदीमधील ‘मौसम’ हा शब्ददेखील तयार झाला आहे. अरबी भाषेमध्ये ‘मौसिम’चा अर्थ ऋतू असा होतो.

राज्यातील पावसाचे प्रमाण

  • 12 जून : 0.9
  • सामान्य रेंज : 6.6
  • फरक टक्क्यांमध्ये : (-87%)
  • 1 जून ते 12 जून मधील पाऊस : 8.8
  • 1 जून ते 12 जून मधील सामान्य रेंज : 52.8
  • फरक टक्क्यांमध्ये : (-83)

कोल्हापुरातील पाऊस

  • 12 जून : 3.1
  • सामान्य रेंज : 10.7
  • फरक टक्क्यांमध्ये : (-71%)
  • 1 जून ते 12 जूनमधील पाऊस : 9.9
  • 1 जून ते 12 जूनमधील सामान्य रेंज : 88.9
  • फरक टक्क्यांमध्ये : (-89%)

यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आहे. तसेच मान्सूनपूर्व पाऊसही कमी झाला आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळामुळे अनुकूल स्थिती निर्माण झाली असून मान्सून सक्रिय होईल.
– सचिन पन्हाळकर,  हवामान बदल अभ्यास केंद्र समन्वयक

Back to top button