कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात रॅमबुटान हा वृक्ष नुकताच आढळला असून, महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्ह्यातील संदर्भ ग्रंथात या वृक्षाची प्रथमच नव्याने शास्त्रीय नोंद झाल्याची माहिती ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिली.
निसर्गभ्रमंती करताना वनस्पतीप्रेमी डॉ. सुभाष आठले यांना कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील अणदूर धरणाजवळ असलेल्या एका रिसॉर्टच्या परिसरात फळांनी लगडलेला एक अनोळखी वृक्ष दिसला. त्यांनी त्याचे फोटो काढून वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांना पाठविले. डॉ. बाचुळकरांनी काही वर्षांपूर्वी असाच वृक्ष केरळमध्ये वनस्पती उद्यानात पाहिला होता. हा वृक्ष स्वत: प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तो रॅमबुटानचा असल्याचे स्पष्ट झाले.
रॅमबुटान या वृक्षाचे शास्त्रीय नाव 'निफॅलियम लप्पासियम' असून हा 'सपिंंडेएसी' म्हणजेच रिठ्याच्या कुळातील व लिची फळाच्या प्रजातीमधील आहे. हा विदेशी, सदाहरित वृक्ष मूळचा मलेशिया, इंडोनेशिया या देशांतील आहे. फळांसाठी या वृक्षांची लागवड थायलंड, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, कोलंबिया, कोस्टारिका, इक्वेडोर, क्युबा या देशांत मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील केरळमध्ये काही प्रमाणात याची लागवड दिसून येते.