टाईम बँक : अफलातून संकल्पना! | पुढारी

टाईम बँक : अफलातून संकल्पना!

कोल्हापूर : सुनील कदम

सवारा वक्‍त ने उसको, जिसने
वक्‍त का सही मतलब समझा,
वरना वक्‍त का महत्त्व क्या हैं,
ये तो वक्‍त का मारा ही बता सकता हैं…

असा एक हिंदी शेर आहे. माणसाच्या आयुष्यात वेळेला किती महत्त्व आहे, ते समजावून द्यायला हा एक शेर पुरेसा आहे. पण वेळेचे महत्त्व जाणून घेईल तो माणूस कसला! नको त्या कामात आपल्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ माणूस वाया घालवून बसतो. अशा माणसावर शेवटी यायची तीच वेळ येते… पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते व माणसाच्या हातात पश्‍चात्तापाशिवाय काही उरत नाही.
पण मंडळी, आता घाबरण्याचे कारण नाही. हे खरे आहे की,

‘अभी तक कोई इतना अमीर
नहीं हुआ हैं, की बिता हुआ
वक्‍त खरीद सकें!
पण… पण…!
‘कोई इतना गरीब भी नहीं हैं की
आनेवाला वक्‍त ना बदल सके!’

कारण निघून गेलेली वेळ खरेदी करण्याची कुणाकडे भलेही काही सोय नसेल; पण हाती असलेला फावला वेळ चक्‍क बँकेत ठेवण्याची सोय आजकाल उपलब्ध झालेली आहे. तुमचा ‘फावला वेळ’ तुम्ही बँकेत ठेवू शकता आणि तुमच्या अडीअडचणीच्या वेळी तो बचत केलेला वेळ तुम्ही वापरू शकता. जगभरातील जवळपास तीस देशांमध्ये अशा ‘टाईम बँका’ कार्यरतसुद्धा झालेल्या आहेत. भारतातसुद्धा टाईम बँकेची सुरुवात झाली आहे, पण अनेक ‘रिकामटेकड्यांना’ हे ठाऊकदेखील नाही की आपण ठेवीदार होऊ शकतो! चला तर जाणून घेऊया नेमकी काय आहे ही टाईम बँकेची अफलातून संकल्पना आणि त्याची कार्यपद्धती!

टाईम बँक ही अशी एक संकल्पना आहे की, तुम्ही तुमच्या दिवसभरातील ‘फावला वेळ’ कुणातरी ‘गरजवंताला’ देऊन टाकायचा. तास – दीड तास – दोन तास… तुमचा जेवढा वेळ तुम्ही दुसर्‍याला त्याच्या कामासाठी द्याल, तेवढा कालावधी टाईम बँकेत तुमच्या खात्यावर जमा होणार. हा ‘समयसंचय’ तुम्ही तुमच्या अडीअडचणीच्या वेळी वापरू शकणार!

उदा. लहानपणी – तरुणपणी – फावल्या वेळात तुम्ही एखाद्या रुग्णाची किंवा वृद्धाची शंभर तास सेवा केल्यास, तुमच्या आजारपणात, वृद्धपणात किंवा अन्य आवश्यक वेळी असाच कुणीतरी ‘वेळेचा ठेवीदार’ शंभर तास तुमच्या सेवेसाठी हजर होणार! तुम्ही जी सेवा कराल, त्याच्या बदल्यात तीच सेवा तुम्हाला मिळेल, असे नाही. तुम्हाला दुसर्‍या ठेवीदाराचा तेवढा वेळ मिळेल, जो तुम्ही तुमच्या कोणत्याही कामासाठी वापरू शकता. या कामांचे स्वरूप मात्र समाजमान्य सेवा असेच असते, भलतेसलते नाही.

‘अच्छे वक्‍त की किमत केवल वही
व्यक्‍ती समझ सकता हैं, जिसने
जीवन में बहुत बुरा वक्‍त देखा हो!

या न्यायाने ज्याने कुणी ‘बहुत बुरा वक्‍त’ अनुभवला असेल, त्याच्या डोक्यातून बहुदा या संकल्पनेचा जन्म झाला असावा. कारण टाईम बँक ही आजकालची संकल्पना नाही, तर त्याला जवळपास दोनशे वर्षांची पार्श्‍वभूमी आहे. 18 मे 1832 रोजी अमेरिकेतील जॉसी वॉरेन याने ‘मजुरांच्या बदल्यात मजूर’ या तत्त्वाने ‘सिनसिनाटी टाईम स्टोअर’ नावाने पहिली टाईम बँक चालू केल्याचे दिसते. जवळपास तीन वर्षे या बँकेचे कामकाज चालू होते. अगदी अलीकडील काळाचा विचार करायचा झाला तर 1973 साली जपानमध्ये पहिल्या टाईम बँकेची सुरुवात झाली असून अजूनपर्यंत तरी या बँकेचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे.

आज जगभरातील अमेरिका, चीन, रशिया, आफ्रिका आदी 30 देशांमध्ये वेगवेगळ्या टाईम बँकांच्या जवळपास 500 शाखा कार्यरत असून लाखो लोक या बँकांचे लाभार्थी आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे या सर्व बँकांकडे मिळून ‘40 लाख तास’ एवढी महाप्रचंड ठेव जमा झालेली आहे. रोज त्यात भर पडत असून रोजच्या रोज गरजवंतांकडून या ठेवींचा वापरही सुरू आहे. भारतातील मध्य प्रदेशमध्ये 2016 साली पहिल्या टाईम बँकेची सुरुवात झाली आहे. पण अन्य राज्यांमध्ये अजूनही ही संकल्पना फारशी मूळ धरताना दिसलेली नाही.

जगभरातील सध्याची समाजरचना ही पैशावर आधारित अशा स्वरूपाची आहे. म्हणजे पैसे मोजून आपण कोणतीही सेवा किंवा वस्तू बाजारातून विकत घेऊ शकतो. पण माणसाच्या अशाही काही गरजा आहेत की, ज्या केवळ पैशाने विकत घेता येत नाहीत. कुणाचा एकटेपणा, कुणाची साथसंगत, कुणाचे तरी बालपण, तर कुणाचे म्हातारपण अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या पैशाने पुर्‍या केल्या जाऊ शकत नाहीत. कारण त्याला भावनेची जोड असावी लागते. अशा पद्धतीने ज्या गोष्टी पैशाने विकत मिळत नाहीत, अशा भावनिक आणि आवश्यक सेवा आपण टाईम बँकेच्या माध्यमातून मिळवू शकतो.

कुणावर कधी कोणती वेळ येईल, ते सांगता येत नाही. कुणाकडे कोणताही कामधंदा नसल्यामुळे फावला वेळच वेळ असतो, तर कुणाकडे आपल्या अत्यावश्यक कामासाठीही वेळ नसतो. आपल्या आयुष्यातील काही काळ कुणाच्या तरी सत्कारणी लागावा असे कुणाला वाटत असते, तर आपल्या पडत्या काळात कुणीतरी आपणाला वेळ द्यावा, अशी कुणाची अपेक्षा असते.अशा दोन्ही गटांतील लोकांसाठी टाईम बँक ही एक अफलातून संकल्पना आहे. त्यामुळे एकदा का आपणही टाईम बँकेचे ठेवीदार झालो की हक्‍काने म्हणू शकतो…

‘ए वक्‍त तू कितना भी सता ले
हमे लेकीन याद रख,
किसी मोड पर तुझे भी बदलने
पर मजबूर कर देंगे’!
टाईम बँकेतर्फे मिळू शकणार्‍या सेवा!

लहान मुलांचा सांभाळ आणि त्यांचा शालेय अभ्यास, आजारी अथवा वृद्ध लोकांची काळजी – औषधपाणी, वेळप्रसंगी किंवा आवश्यकतेनुसार शेजारधर्माचे पालन, पर्यावरणविषयक बाबींची काळजी, सामाजिक किंवा सामुदायिक कार्यांमध्ये मदतकार्य, ठरावीक कालावधीसाठी मैत्री किंवा साथसोबत, सामाजिक पातळीवर सहकार्य, घराची काळजी किंवा घरकामात मदत, शेतीकामात मदत, कोणत्याही कामात मार्गदर्शक म्हणून मदत, बाजार आणण्यासाठी मदत यांसह माणसाला ज्या ज्या कामात इतरांची मदत लागू शकते, ती ती कामे टाईम बँकेच्या माध्यमातून होऊ शकतात. थोडक्यात ‘इस हाथ से दो और उस हाथ से लो’ अशा स्वरूपाचा हा मामला आहे.

Back to top button