कोल्हापूर : गणेशोत्सव खटल्यातून राजेश क्षीरसागर यांच्यासह खंडोबा तालमीचे कार्यकर्ते निर्दोष | पुढारी

कोल्हापूर : गणेशोत्सव खटल्यातून राजेश क्षीरसागर यांच्यासह खंडोबा तालमीचे कार्यकर्ते निर्दोष

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : पापाची तिकटी येथे 2013 साली गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक झालेल्या लाठीचार्ज खटल्यातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि खंडोबा तालमीच्या कार्यकर्त्यांची जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली. गेली सुमारे 9 वर्षे या खटल्याचे काम सुरू होते.

सबळ पुराव्याअभावी राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश न्यायाधीश साळुंखे यांनी दिले. अ‍ॅड. धनंजय पठाडे आणि अ‍ॅड. महांतेश कोले यांनी या खटल्याचे काम पाहिले. 2013 च्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत शिवाजी पेठेतील खंडोबा तालमीची मिरवणूक शिवसेनेच्या पान-सुपारी मंडपासमोर आल्यानंतर कार्यकर्ते व पोलिसांत वादावादी झाली होती. तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रियासिंग आणि करवीरच्या डीवायएसपी वैशाली माने यांच्या आदेशाने लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्ज विरोधारात रस्त्यावर उतरलेल्या क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरही बेछूट लाठीचार्ज झाल्याने ते जखमी झाले होते. याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. गुन्ह्यामध्ये विनयभंगासारखाही गुन्हा नोंद झाल्याने सर्वांना अटक झाली होती. याबाबत क्षीरसागर यांनी राज्याच्या सर्वोच्च सभागृहात आवाज उठवला होता. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. शुक्रवारी खटल्याचा निकाल लागून सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे जयवंत हारुगले, उदय भोसले, रमेश खाडे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, खंडोबा तालमीचे चंद्रकांत सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, महेश चौगले, अरुण दळवी, अमोल साळोखे, दिलीप सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button