

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होणार्या पंचगंगा आणि भोगावती नदीतील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पाणी उपशावर मर्यादा येत आहेत. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्गही कमी आहे. आताच कोल्हापूरला पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबला, तर ही स्थिती गंभीर होणार आहे. परिणामी, कोल्हापूरवर दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट ओढवले जाणार आहे.
शिंगणापूर उपसा केंद्रात 435 एचपीचे 5 पंप आहेत. त्यापैकी दररोज 4 पंप सुरू असतात. एक पंप स्टँडबाय आहे. या केंद्राद्वारे पाणी उपसा पूर्ण क्षमतेने होण्यासाठी शिंगणापूर बंधारा येथे पंचगंगा नदीत 536 मीटर इतकी पाणी पातळी लागते; मात्र नदीची पाणी पातळी गुरुवारी 535 मीटर होती. बालिंगा उपसा केंद्रात 30 एचपीचा व्हीटी आणि 300 एचपीचा सबमर्सिबल पंप आहे. त्याबरोबरच 150 एचपीचे दोन पंप आहेत. नागदेववाडी उपसा केंद्रात 200 एचपीचा आणि 120 एचपी असे दोन पंप आहेत. बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी भोगावती नदीची पाणी पातळी 1,762 फूट इतकी लागते. परंतु, गुरुवारी पाणी पातळी 1,756 फूट इतकी होती. कोल्हापूर शहरासाठी पंचगंगा आणि भोगावती नदीतून पाण्याचा उपसा होतो.
राधानगरी धरणातील पाणी दोन्ही नदीत सोडले जाते. पंचगंगा नदीतील पाणी उपसासाठी शिंगणापूर येथे तर भोगावती नदीतील पाणी उपसा करण्यासाठी बालिंगा व नागदेववाडी येथे उपसा केंद्रे आहेत. तीन उपसा केंद्राद्वारे नदीतील कच्चे पाणी उचलून पुईखडी, बालिंगा, कसबा बावडा, कळंबा या फिल्टर हाऊसमध्ये नेले जाते. त्याठिकाणी जलशुध्दीकरण करून ते शहरातील टाक्यात सोडण्यात येते. त्यानंतर शहरभर सुमारे 700 किलोमीटर लांब पसरलेल्या जलवाहिनींच्या जाळ्याद्वारे नागरिकांना पिण्यासाठी पाणी वितरण केले जाते.
खासगी टँकर भाड्याने घेतले…
महापालिकेकडे स्वमालकिचे 7 टँकर आहेत. 8 हजार लिटरचे टँकर 4 फक्त पाणी पुरवठा विभागाकडे वापरासाठी आहेत. तर 6 हजार लिटर क्षमतेचे 3 टँकर आरोग्य आणि उद्यान विभागाकडे वापरासाठी आहेत. टंचाईच्या कालावधीत शहरवासियांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने सद्यस्थितीत 10 हजार लिटर क्षमतेचे 3 टँकर भाडेतत्वावर घेतले आहेत. पाणी पुरवठा अपुरा होत असल्याने आता त्या टँकरचा वापर केला जाणार आहे.
पाण्याचा उपसा…
पंचगंगा नदी : 112.15 एमएलडी
भोगावती नदी : 77.22 एमएलडी
कळंबा तलाव : 8.83 एमएलडी
शहरातील नळ कनेक्शन
निवासी : 1,03,106
व्यापारी : 1,723
औद्योगिक : 1,486
एकूण : 1,06,315