Kolhapur Bandh: कोल्हापुरात शांतता प्रस्थापित करण्यात यश : पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज (दि.७) माध्यमांशी बाेलताना दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनीही सर्व संघटनांना शांततेचे आवाहन (Kolhapur Bandh) केले आहे.
कोल्हापूर शहरात वातावरण बिघडविणाऱ्या दंगेखोरांची गय (Kolhapur Bandh) केली जाणार नाही. सरकारी व खासगी मालमत्तेचे नुकसान केलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे.
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशीही माहिती महेंद्र पंडित यांनी दिली. या प्रकरणी शाहूपुरी पाोलीस ठाण्याअंतर्गत तिघांना तर लक्ष्मीपूरी पाोलीस ठाण्याअंतर्गत दाेघांवर कारवाई झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महेंद्र पंडित यांनी सांगितले की, शहरात काही तरुणांनी टार्गेट करूनच तोडफोड केली आहे. उलटबाजी आणि दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पांगवले. ज्या तरुणांनी दगडफेक केली आहे. त्यांना शोधण्याचे काम सुरू केले आहे. कोणत्या घरांवर दगडफेक केली, याचा तपास पोलिसांकडून केला जाईल, ज्यांचे नुकसान झाले, त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
जिल्हा प्रशासनाकडून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. शहराबाहेरून कोणते लोक आले याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. ज्या चौकामध्ये कार्यकर्ते एकत्र झाले. त्यामुळे तिथे परिस्थिती थोडी हाताबाहेर गेली, असे पंडित यांनी सांगितले.
कोल्हापूर बंदची हाक देऊ नये, यासाठी बैठक घेऊन शांततेचा आवाहन केले होते. मात्र, तरुणांना हे मान्य नव्हते, त्यातील काही तरुणांनीच हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. विनाकारण फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घ्या, अशा पोलिसांना सुचना दिल्या आहेत. काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे, त्यांचे मोबाईलही जप्त केले आहेत, मात्र, त्याची अधिकृत आकडेवारी नाही, असे पंडित यांनी सांगितले.
औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कोल्हापूर शहरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. आजही सकाळपासून काही परिसरात प्रचंड तणाव होता. पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही भागात तोडफोड झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला.
कारवाईबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक पंडित म्हणाले की, “औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तोडफोड करणार्या समाजकंटकांवरही कारवाई करण्यात आली आहे.”
हेही वाचा