Shivrajyabhishek 2023 : नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक दिन साजरा | पुढारी

Shivrajyabhishek 2023 : नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक दिन साजरा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘दो तरफ निगा फर्माके, बरमीन – बरमेशूर – बरमे कदम… बराके, बरबुलंदी बरबोला महाराज … हिंदूपद पातशहा….’ अशी राजदंडधारी चोपदारांची ललकारी, चौरे, मोर्चेल, अब्दागिरीसह विविध राज्यचिन्हे घेऊन उभारलेले हुजरे, अशा राजदरबारी वातावरणात आणि सूर्योदयाच्या सुवर्ण किरणांच्या साक्षीने मंगळवारी नवीन राजवाड्याच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 349 वा राज्याभिषेक दिन सोहळा (Shivrajyabhishek 2023) उत्साहात साजरा करण्यात झाला.

शिवछत्रपतींच्या सुवर्ण मूर्तीवर सकाळी 9 वाजता अभिषेकानंतर कवड्याची माळ आणि पुष्पहार-फुले वाहून पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवमूर्तीची प्रांगणात मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी श्री शाहू महाराज, मालोजीराजे, यशराजराजे, सौ. याज्ञसेनी महाराणी, सौ. मधुरिमाराजे, यशस्विनीराजे या छत्रपती घराण्यातील सदस्यांनी शिवछत्रपतींच्या मूर्तीस अभिवादन केले. छत्रपतींचे राजोपाध्ये बाळकृष्ण दादर्णे यांच्या मंत्रोच्चारात आणि सनई-चौघड्याच्या मंगल स्वरात राज्याभिषेक दिन सोहळ्याचे सर्व विधी झाले.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

सोहळ्यास दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, आ. जयश्री जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, पोलिसप्रमुख महेंद्र पंडित, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, राम यादव, इंद्रजित माने, मोडीतज्ज्ञ अमित अडसुळे, पुराभिलेखाधिकारी गणेशकुमार खोडके, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मल्हार सेनेचे बबन रानगे, मावळा कोल्हापूरचे अध्यक्ष उमेश पोवार, मुस्लिम बोर्डिंगचे आदिल फरास, सौ. वसुधा पवार, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, हिंदकेसरी विनोद चौगुले, पै. बाबा राजेमहाडिक, पैलवान विष्णू जोशीलकर, कोल्हापूर सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव, नागरी कृती समितीचे सदस्य अशोक पोवार, रमेश मोरे, ऋतुराज इंगळे, नीलराजे पंडित-बावडेकर, बाळ पाटणकर, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण, देवेंद्र खर्डेकर, रणजित चव्हाण (हिम्मत बहाद्दर), मालोजी घोरपडे, प्राणिल इंगळे, इंद्रजित नागेशकर, तेज घाटगे, अर्जुन माने, दिगंबर फराकटे, उत्तम फराकटे, माणिक मंडलिक, लाला गायकवाड, प्रताप घोरपडे, उदय बोंद्रे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठमोळ्या पोशाखांमुळे वातावरणनिर्मिती

नवीन राजवाड्याच्या प्रांगणात प्रथमच झालेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी उपस्थितांनी मराठमोळी वेशभूषा केली होती. दरबारी मानकर्‍यांची पारंपरिक वेशभूषा, बाराबंदी, पगडी, फेटा, झब्बा, शेरवानी, नऊवारी साडी यासह भगवे ध्वज, भगव्या टोप्या, कपाळाला अष्टगंधी-कुंकू आणि मराठमोळी आभूषणं परिधान करून अवघे एकवटल्याने वातावरणनिर्मिती झाली होती. कार्यक्रमाचे नेटके संयोजन छत्रपती शहाजी म्युझियम ट्रस्ट, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन, छत्रपती शाहू विद्यालय व सहकारी संस्था-संघटनांच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन मोनाली पाटील व पल्लवी चव्हाण यांनी केले.

पोवाडे, स्फूर्ती गीते अन् युद्धकला (Shivrajyabhishek 2023)

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या बँड पथकाने स्फूर्तिदायी गीतांचे सादरीकरण करून वातावरणनिर्मिती केली. या पथकाला शाहू महाराज यांच्या हस्ते विशेष भेट देण्यात आली. कोल्हापूर पोलिस दलाच्या बँड पथकानेही उपस्थितांची मने जिंकली. शिवशाहीर कृष्णात नेताजी पाटील पोवाडा पथकाने शाहीरतिलक पिराजीराव सरनाईकलिखित शिवछत्रपतींचा ‘दिल्ली दरबारातील पराक्रम’ हा पोवाडा सादर करून उपस्थितांसमोर शिवकाळ उभा केला. हिंद प्रतिष्ठानचे मावळे व रणरागिणी यांनी शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. छत्रपती शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ हे स्फूर्ती गीत, तर ‘तारा कमांडो फोर्स’ने मराठा बटालियन स्फूर्ती गीत ‘मर्द आम्ही मराठे खरे…’ सादर केले.

Back to top button