

कोल्हापूर, अनिल देशमुख : ज्या ऑपरेटरच्या नावे आयडी आहे, त्याच्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन, त्याचा शिक्का करून, त्याद्वारे बेकायदेशीर आधार सुविधा केंद्र चालवण्याचा प्रकार जिल्हा प्रशासनाने उघडकीस आणला. शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठेतील अशी दोन आधार सुविधा केंद्रे सील केली आहेत. आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारे काम सुरू असल्याचे समोर आले आहे, त्यावरही कारवाई होणार असून, या सर्वांवर पोलिसांत गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
ज्या आधार कार्डला दहा वर्षे झाली आहेत, त्यांचे प्रमाणीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासह आधार कार्डवरील दुरुस्ती आणि नवीन आधार कार्ड काढण्याचेही काम सातत्याने सुरू असते. याचा फायदा घेत, बेकायदेशीरपणे आधार सुविधा केंद्रे सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवार पेठ आणि शिवाजी पेठेत सुरू असलेल्या केंद्रांवर प्रशासनाने छापे टाकले.
या कारवाईत धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्याच्या नावे हे सुविधा केंद्र होते, त्या ऑपरेटरच्या अंगठ्याचा ठसा घेऊन, त्याचा थेट शिक्काच तयार केल्याचे समोर आले. शिक्का शाईत बुडवून अन्यत्र उठवला जातो. मात्र, हा शिक्का शाईत न बुडवता, तो ऑपरेटरचा थम म्हणून वापरला जात होता. त्याद्वारे आधार कार्डशी संबंधित सर्व कामे केली जात असल्याचे समोर आले. ज्या ऑपरेटरच्या अंगठ्याचा हा शिक्का बनवला होता, त्या ऑपरेटरच्या नावे हे आधार मशिन गडहिंग्लज येथे नोंद आहे. मात्र, त्याऐवजी त्याचा कोल्हापुरात शिवाजी पेठेत वापर केला जात असल्याचेही समोर आले. असाच प्रकार मंगळवार पेठेतही उघडकीस आला आहे.
अशाच प्रकारे शहरात आणखी काही केंद्रे सुरू असल्याचे समोर आले आहे. त्याची सर्व माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित सर्वांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
नागरिकांची सुरू होती लूट !
या आधार सुविधा केंद्रांवर नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड प्रमाणीकरण, दुरुस्ती या सर्व कारणांसाठी नागरिकांकडून जादा पैसे घेतले जात होते. या ठिकाणी नागरिकांची अक्षरश: लूट सुरू होती, असेही समोर आले आहे.