आज कोल्हापूर बंदची हाक | पुढारी

आज कोल्हापूर बंदची हाक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कोल्हापूर शहरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. या प्रकारामुळे हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या. पोस्ट व्हायरल करणार्‍यांच्या घरावर चाल करून प्रक्षुब्ध जमावाने सिद्धार्थनगर व दसरा चौक येथील प्रार्थनास्थळावर दगडफेक केली. लक्ष्मीपुरीतील बाजारपेठ, दुकाने, स्टॉल तसेच सीपीआर चौक परिसरातील हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली. शहरात दिवसभर प्रचंड तणाव होता. पोलिसांनी जमावावर लाठीहल्ला केल्याने संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी (दि. 7) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी चौकात एकत्रित जमण्याचे आवाहन या संघटनांनी केले आहे.

औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट आणि स्टेटस व्हायरल करणार्‍या समाजकंटकांना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले होते. सुमारे दीड हजाराहून अधिक प्रक्षुब्ध कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर दिवसभर ठाण मांडून रास्ता रोको केला. कार्यकर्त्यांनी सीपीआर चौक, दसरा चौक आणि लक्ष्मीपुरीसह विविध ठिकाणी घोषणाबाजी करून समाजकंटकांविरुद्ध कारवाईची मागणी केली.

लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी परिसरातील तणावपूर्ण स्थितीमुळे अकबर मोहल्ला, सदर बाजार महाराणा प्रताप चौक, भाऊसिंगजी रोड, दसरा चौक, विक्रमनगर, टेंबलाईवाडी परिसरात पडसाद उमटले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. ठिकठिकाणी पोलिसांनी केलेला लाठीहल्ला आणि दगडफेकीत दोन तरुण जखमी झाले आहेत. शहरातील विविध भागात रात्री उशिरापर्यंत पोलिसांची गस्त सुरू होती.

गेल्या चार-पाच दिवसांपासून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि आक्षेपार्ह स्टेटस व्हायरल होत असल्याने लक्ष्मीपुरी, शाहूपुरीसह काही भागात तणाव होता. मात्र सोमवारी रात्री उशिरा काही समाजकंटकांनी मोबाईलवर औरंगजेबाच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याचे निदर्शनास आल्याने शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक बनले.

सदर बाजार येथील एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यामुळे बजरंग दलाचे शहर प्रमुख पराग फडणवीस, ओंकार शिंदे, सुमित पवार, दिलीप वाळा, प्रथमेश मेठे यांच्यासह शेकडो संतप्त कार्यकर्त्यांनी सकाळी शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांची भेट घेऊन समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी केली.

संतप्त कार्यकर्त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या आवारात ठाण मांडल्याची बातमी शहरात पसरताच अन्य संघटनांचे कार्यकर्त्यांनी तिथे गर्दी केली. प्रक्षुब्ध जमावाने सदरबाजार येथील तरुणाच्या घरावर चाल करण्याचा प्रयत्न केला. संबंधित तरुण घरी नसल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा फौजफाटा वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला.

त्यानंतर दुपारी दोनच्या सुमाराला हिंदुत्ववादी संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. औरंगजेबाच्या समर्थनाचे स्टेटस ठेवणार्‍या तरुणाला तातडीने अटक करा अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. जोरदार घोषणाबाजी करून समाजकंटकांचा निषेध करण्यात आला.

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर प्रक्षुब्ध जमावाची घोषणाबाजी सुरू असताना ओंकार शिंदे, सुमित पवार, सौरभ निकम, साईराज पाटील, सुमित साठम, सौरभ पवार, यश लोहार यांच्यासह कार्यकर्त्यांनी अकबर मोहल्ला येथील संशयित तरुणाच्या घरावर चाल केली. यावेळी संशयित घरात नव्हता. मात्र त्याच्या भावाने कार्यकर्त्यांनी दुरुत्तरे केल्याने तणाव वाढला, कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिस आणि परिसरातील नागरिकांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना तेथून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडे पाठविले.

दरम्यान, काही वेळाने शहरातील विविध भागातील विविध संघटनांचे शेकडो कार्यकर्ते लक्ष्मीपुरी परिसरात दाखल होऊ लागले. त्यामुळे तणाव वाढू लागला. तरुणांच्या एका गटाने टाऊन हॉल परिसरातील प्रार्थनास्थळाकडे धाव घेऊन प्रार्थनास्थळावर दगडफेक केली. तसेच सीपीआर चौक मार्गावरील हातगाडी, स्टॉल व दुकानांची जमावाने तोडफोड सुरू केली. पोलिस घटनास्थळी दाखल होताच हा जमाव दसरा चौकाच्या दिशेने गेला. जमावाकडून तेथील एका प्रार्थनास्थळावर दगडफेकीला सुरुवात होताच पोलिसांनी जमावावर लाठीहल्ला केला.

शहर पोलिस उपअधिक्षक अजित टिके, लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे महादेव वाघमोडे, शाहूपुरीचे राजेश गवळी, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे सतीश गुरव यांच्यासह पोलिस मुख्यालय, राज्य राखीव दलाचा फौजफाटा दाखल झाला. जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी दसरा चौकसह कोंडाओळ परिसरात सौम्य लाठीमार केला. यामुळे जमावाची पांगापांग झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

सायंकाळी संतप्त आणि आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. समाजकंटकांना अटक केल्याशिवाय येथून कोणी हलायचे नाही, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला.

अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा करून दोघा अल्पवयीन समाजकंटकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती दिल्यानंतर बैठकीतील तणाव काहीसा निवळला. मात्र कार्यकर्ते आक्रमकच होते. प्रक्षुब्ध जमावासमोर बोलताना हिंदुत्ववादी संघटनेचे संभाजी साळुंखे, उदय भोसले यांनी समाजकंटकांच्या कृत्याचा निषेध केला.

जिल्ह्यात बंदी आदेश लागू

शहरात मंगळवारी दुपारी झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर जिल्हा प्रशासनाने बंदी आदेश लागू केला. मंगळवार, दि. 6 रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. दि. 19 जून रोजी रात्री बारापर्यंत या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Back to top button